मासेमारीचा मुहूर्त ११ आॅगस्ट
By admin | Published: July 30, 2015 12:31 AM2015-07-30T00:31:04+5:302015-07-30T00:31:04+5:30
हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर
पालघर : हवामान खात्याकडून समुद्रात तुफानी लाटा आणि वादळी वारे वहात असल्याचे इशारे वारंवार दिले जात असल्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य जीवीतहानी व आर्थिक हानीची शक्यता पहाता पालघर, डहाणू तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट ऐवजी ११ आॅगस्ट नंतर मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय आज एकमताने घेतला आहे.
राज्यशासनाने महाराष्ट्र मासेमार सागरी नियमन अधिनियमन १९८१ अन्वये १० जुन ते १५ आॅगस्ट पासून पावसाळी बंदी कालावधी घोषीत केला होता. परंतु अपरिमीत मासेमारीमुळे मत्स्य दुष्काळाचे संकट मच्छीमारांवर घोंगावू लागल्याने पालघर, डहाणू, वसई, गुजरात राज्यातील मच्छीमारांनी मत्स्य उत्पादन व मत्स्य संवर्धनाच्या दृष्टीने निर्णय घेत १५ मे पासूनच मासेमारी व्यवसाय बंद ठेवला होता. त्याचे सकारात्मक बदल होऊन पावसाळी बंदीनंतर माशांच्या उत्पादनात मोठी वाढ होत असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने सागरी अधिनियमात बदल करून १ मे पासूनच मासेमारी बंदी कालावधी घोषीत करावा अशी मागणी म. म. कृती समिती सह सर्व सहकारी संस्थांनी केली होती. या मागणीकडे दुर्लक्ष करीत राज्य व केंद्रशासनाने परिपत्रक काढून १ जून ते ३१ जुलै अशी पावसाळी मासेमारी बंदी मच्छीमारावर लादली होती. त्यामुळे मच्छीमार वर्गातून संतप्त प्रतिक्रीया उमटल्या होत्या.
केंद्र व राज्य शासनाच्या परिपत्रकानुसार पालघर, डहाणू, वसई तालुक्यातील मच्छीमारांनी १ आॅगस्ट पासून मासेमारी व्यवसायाला सुरूवात होण्याच्या दृष्टीने बोटीला रंगरंगोटी, नवीन जाळी विणणे, खलाशी कामगारांची व्यवस्था करणे, इंजीन दुरूस्ती करून बोटीत डिझेल, जाळी भरून पूर्ण तयारी केली होती. परंतु २५ जुलै पासून मुसळधार पावसासह जोरदार वादळी वारे वाहत समुद्रात तुफानी लाटा निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मच्छीमारांनी मासेमारीला समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्याकडून वारंवार येत
आहे.
त्यामुळे सन १९८२ साली याच जुलै महिन्यात समुद्रात ८७ मच्छीमारी ट्रॉलर्स बुडून ३०४ मच्छीमारांचा बुडून मृत्यू झाला होता. त्याच घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सातपाटी मधील सर्वोदय सहकारी संस्था व मच्छीमार सहकारी संस्था या दोन संस्थानी आज सातपाटी येथे बैठक घेऊन ११ आॅगस्टपासून मासेमारीला समुद्रात जाण्याचा निर्णय एकमताने घेतल्याचे नरेंद्र पाटील व राजन मेहेर या संस्थांच्या अध्यक्षांनी सांगितले. याचवेळी मच्छीमार नेते अशोक अंभीरे यांनीही या निर्णयाचे समर्थन केले.