समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सवाल्या मच्छीमारांची दादागिरी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 12:40 AM2020-12-29T00:40:40+5:302020-12-29T00:40:51+5:30

शेकडोच्या संख्येने येणाऱ्या ट्रॉलर्स मालकांच्या दहशतीचा फटका जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमारांना बसत आहे. 

Fishing with perch trawlers at sea increased | समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सवाल्या मच्छीमारांची दादागिरी वाढली

समुद्रात पर्ससीन ट्रॉलर्सवाल्या मच्छीमारांची दादागिरी वाढली

Next

पालघर/वसई : घोळ-दाढा आदी मोठे आर्थिक उत्पन्न देणाऱ्या माशांच्या थव्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्याच्या हद्दीत आलेल्या केंद्रशासित दिव-दमणच्या एका पर्ससीन ट्रॉलर्समधील मच्छीमारांनी वसईमधील मच्छीमारांवर जीवघेणा हल्ला करून जखमी केले आहे. पर्ससीन ट्रॉलर्सवाल्या मच्छीमारांची दादागिरी वाढत असून, शेकडोच्या संख्येने येणाऱ्या ट्रॉलर्स मालकांच्या दहशतीचा फटका जिल्ह्यातील परंपरागत मच्छीमारांना बसत आहे. 

२५ डिसेंबर रोजी पाचुबंदर येथून समुद्रात मासेमारीला गेलेल्या ‘विश्वराजा’ या बोटीतील मच्छीमारांवर केंद्रशासित दिव-दमण येथील एका पर्ससीन मासेमारी करणाऱ्या ट्राॅलर्समधील मच्छीमारांनी अन्य साथीदार बोटींच्या साहाय्याने भ्याड हल्ला केला. या घटनेत १० मच्छीमारांवर हल्ला करण्यात आला असून, या हल्ल्यात मोझेस अलिबाग (४९) हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी यलोगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त आनंद पालव यांनी आपल्या अधिकाऱ्याला अधिक तपास करण्यासाठी पाठविल्याचे ‘लोकमत’ला सांगितले.

दरम्यान, राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या १२ नाॅटिकल समुद्र हद्दीत जानेवारी ते मेदरम्यान पर्ससीन आणि एलईडी मासेमारीला २०१८ पासून बंदी घालण्यात आली असून, सप्टेंबर ते डिसेंबरदरम्यान त्यांना १२ नॉटिकल क्षेत्रात मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदी कालावधी वगळता संपूर्ण वर्षभर या ट्रॉलर्स समुद्रात कोणाच्या आशीर्वादाने फिरत असतात, याचा शोध मत्स्यव्यवसाय विभागाने घ्यायला हवा, अशी मागणी मच्छीमारांमधून केली जात आहे.

पालघरच्या सहायक मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत फक्त एकच पेट्रोलिंग बोट असल्याने आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने त्यांच्या मर्यादा उघड्या पडत आहेत. १२ नॉटिकल मैल क्षेत्रापुढे समुद्रात बेकायदा फिरणाऱ्या पर्ससीन व एलईडी ट्रॉलर्सवर कारवाई करण्याचे अधिकार कोस्टगार्डला देण्यात आले आहेत,  मात्र त्यांनी मागील दोन वर्षांत अशा बेकायदा ट्राॅलर्सवर कारवाई केल्याच्या घटना घडलेल्या नाहीत.

Web Title: Fishing with perch trawlers at sea increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.