स्टेट हाऊसिंग फायनान्सवर भाजपाचे पाच संचालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 03:40 AM2018-07-06T03:40:27+5:302018-07-06T03:40:35+5:30
महाराष्ट्र स्टेट को -आॅप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देऊन, भाजपाप्रणित सहकार पॅनेलने मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच संचालक निवडून आणले आहेत.
पालघर : महाराष्ट्र स्टेट को -आॅप हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वर्चस्वाला धक्का देऊन, भाजपाप्रणित सहकार पॅनेलने मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली पाच संचालक निवडून आणले आहेत.
नाशिक विभागातून आमदार बाळासाहेब सानप, माजी आमदार वसंत गिते बिनविरोध, तर निवडणुकीत मुंबई विभागातून सीताराम बाजी राणे, दत्तात्रय शामराव वडेर आणि नागपूर विभागातून राकेश मुकुंदराव पन्नासे विजयी झाले आहेत.
महाराष्ट्र स्टेट हौसिंग फायनान्स कॉर्पोरेशनवर आतापर्यंत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अखंडीत वर्चस्व होते. ते कायम ठेवण्यासाठी दोघांनी आघाडी केली होती. तिचे नेतृत्व अजित पवार, जयंत पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. त्यांना शह देण्याचे काम भाजपने केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, आमदार प्रवीण दरेकर, आणि सहकारातील जेष्ठ नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेल स्थापन करण्यात आले होते. त्याने २१ पैकी ५ जागा पटकाविल्या आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलचा हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये प्रवेश झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस -राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवांराचा अत्यल्प मताने विजय झाला आहे.