विरारमध्ये एकाच कुटुंबातील पाच मुलांना विषबाधा; दोघांचा मृत्यू, तिघांवर उपचार सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 09:57 AM2022-08-14T09:57:01+5:302022-08-14T09:57:37+5:30
उपचारासाठी मनपाच्या रुग्णालयात भर्ती, मुलीची स्थिती आहे गंभीर, विरार फाटा येथील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा :- विरार फाटा येथे राहणाऱ्या एकाच परिवारातील दोन मुलांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला आहे तर तिघे उपचारासाठी नालासोपाऱ्याच्या विजय नगरमधील मनपा हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले आहे. त्यातील सात वर्षीय मुलीची स्थिती नाजूक असल्याचे सूत्रांकडून कळते.
मांडवी पोलिसांनी दोन मुलांच्या मृत्यू प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहे. अश्फाक खान (४५) आणि रजिया खान (४०) हे पाचही मुलांसोबत राहतात. रात्री ११ वाजता पाचही मुलांनी जेवण केले. त्यानंतर मुलगी फरहीन (७) हिला उलट्या सुरू झाल्यावर तिला उपचारासाठी डॉक्टरकडे आई घेऊन गेले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घरी आल्यावर आसिफ (९) हा मयत झाला होता. तर मुलगा फरहाना (१०) आरिफ (४) आणि साहिल (३) या तिघांना उलट्या सुरू झालेल्या होत्या. आईने तिन्ही मुलांना मनपाच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती केले आहे. या प्रकारामुळे विरार परिसरात खळबळ माजली आहे.