चोरीच्या उद्देशाने आलेल्या पाच संशयितांना अटक
By admin | Published: November 28, 2015 01:03 AM2015-11-28T01:03:53+5:302015-11-28T01:03:53+5:30
गुरुवारी नाशिकयेथून येणाऱ्या ट्रकला ५.३० च्या सुमारास अपघात झाल्याचे जवळच्याच गावातील लोकांना कळताच ट्रकमधील संत्र्यांचा माल चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या वसंत बारकू धोडंगा
मोखाडा : गुरुवारी नाशिकयेथून येणाऱ्या ट्रकला ५.३० च्या सुमारास अपघात झाल्याचे जवळच्याच गावातील लोकांना कळताच ट्रकमधील संत्र्यांचा माल चोरण्याच्या उद्देशाने आलेल्या वसंत बारकू धोडंगा (२२), नाना भिका पारधी (२४), पांडू भिका पारधी (२३), अनंता पांडू ठाकरे (२२), लक्ष्मण पांडू माळी (२१) यांना अटक करण्यात आली. पोलीस व पोलीसमित्र यांनी ही कारवाई केली आहे.
पोलीस निरीक्षक डी.पी. भोये यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास व्ही.एन. गवळी (सहायक पोलीस निरीक्षक), ए.यू. सोनावणे (पोलीस नाईक) करीत असून इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
मोखाडा-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर तोरण घाटरस्ता नागमोडी वळणाचा तसेच संरक्षण भिंतीचा अभाव असल्यामुळे येथे नेहमीच अपघात होतात. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांचे नुकसान तर होतेच, त्याचबरोबर गाड्यांमधील मालही चोरून नेला जातो. या घटना वारंवार घडत असल्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.(वार्ताहर)
सार्वजनिक बांधकाम कधी लक्ष देणार?
दरवर्षी मोखाडा सार्वजनिक बांधकाम विभाग विकासकामाच्या नावाखाली करोडोंचा खर्च करत असताना दुसरीकडे तोरण घाटरस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका सुरू आहे. महिन्यातून अनेकदा अपघात होतात.