तुंगारेश्वर जंगलात पाचच बिबटे
By admin | Published: April 26, 2017 11:32 PM2017-04-26T23:32:49+5:302017-04-26T23:32:49+5:30
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाइतकेच क्षेत्रफळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात फक्त पाचच बिबटे उरले असल्याचे आढळून आले आहे.
शशी करपे / वसई
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाइतकेच क्षेत्रफळ असलेल्या तुंगारेश्वर अभयारण्यात फक्त पाचच बिबटे उरले असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर इतर वन्य प्राण्यांचीही संख्या खूपच कमी झाल्याचे दिसून आले आहे. तर शाकाहारी प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे. मानवी अतिक्रमण वाढल्याने वन्यजीव प्राण्यांच्या अस्तित्वावर परिणाम झाला आहे.
इकॉलॉजी या वाईल्ड लाईफ कॉर्झव्हेशन सोसायटी व संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांनी तुंगारेश्वर अभयारण्यात बिबट्यांच्या इकोलॉजीचे विविध पैलू तपासण्यासाठी फेब्रुवारी २०१६ ते जुलै २०१६ दरम्यान २९ कॅमेरे लावले होते. वाईल्ड लाईफ कॉर्झव्हेशन सोसायटीचे सहाय्यक संशोधक निकीत सुर्वे आणि डॉ. विद्या अत्रेय यांच्या देखरेखीखाली हा अभ्यास करण्यात आला.
यात तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यातील बिबट्यांच्या संख्येचा अंदाज, भक्ष्यांची संख्या, बिबट्यांच्या समस्येशी संबंधित विविध पर्यावरणीय व सामाजिक घटकांचा अभ्यास करण्यात आला. त्यासाठी २९ ठिकाणी प्रमाणबद्धरित्या ट्रॅप्स कॅमेरे लावण्यात आले होते. प्रत्येक बिबट्या ओळखता यावा यासाठी त्यांच्या दोन्ही बाजूंची छायाचित्रे घेतली गेली. प्रत्येक चार चौरस किलोमीटरच्या २२२ ग्रीडसमध्ये स्मॉल सेल अॅक्युपन्सी सर्व्हेचा वापर करून वन्य भक्ष्यांच्या घनतेचा अंदाज घेण्यात आला.
या सर्व्हेत अभयारण्यात एकूण पाचच बिबटे आढळून आले असून त्यात दोन नर, दोन मादी आणि एक अज्ञात यांचा समावेश आहे. बिबट्यांचे मुख्य अन्न कुत्री असल्याचेही निष्पन्न झाले
आहे.
अभयारण्यात वन्य भक्ष्यांची घनता खूपच कमी असल्यामुळे स्मॉल सेल अॅक्युपन्सी सर्व्हेतूनही त्यांची संख्या शोधता आली नाही. अभयारण्यात रानडुक्कर, भेकर, ससा, आणि लंगूर आढळून आले असले तरी त्यांचीही संख्या खूपच कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्वेक्षणात चितळ आणि सांबर असल्याबाबत कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि तुुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ समान असले तरी तुंगारेश्वर अभयारण्यात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे.
चांगल्या परिणामासाठी येथील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे, येथील लोकांशी संवाद साधून अभयारण्याभोवतीच्या गावकऱ्यांना त्याच्यापासून संरक्षण प्राप्त करुन देणे यातून स्थानिकांच्या मानसिकतेला सकारात्मक वळण दिल्यास या भागातील महत्वाचा नैसर्गिक वारसा भविष्यातील पिढ्यांसाठी जपता येईल, अशी शिफारस संशोधकांनी आपल्या अहवालात केली आहे.