पाच वर्षे अध्यक्ष शिवसेनेचाच, राष्ट्रवादीला उपाध्यक्षपद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 12:37 AM2020-01-11T00:37:25+5:302020-01-11T00:37:42+5:30
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा पूर्ण होत असल्याने अन्य पक्षांची साथ न घेताच हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करणार आहेत.
पालघर/ठाणे : पालघरजिल्हा परिषदेत शिवसेना (१८) आणि राष्ट्रवादी (१४) मिळून बहुमताचा आकडा पूर्ण होत असल्याने अन्य पक्षांची साथ न घेताच हे दोन्ही पक्ष जिल्ह्यात सत्ता स्थापन करणार आहेत. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेकडे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीकडे उपाध्यक्षपद ठेवण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंसाधन मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, अध्यक्षपदासाठी माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा यांचे नाव आघाडीवर असून, भारती कामडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत यांचीही नावे स्पर्धेत आहेत.
पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेलाच अध्यक्षपद मिळणार असल्यामुळे आणि पहिल्या अडीच वर्षांसाठी अनुसूचित जमातीतील महिलांसाठी आरक्षण असल्यामुळे शिवसेनेतील अमिता घोडा, भारती तांबडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत ही नावे या पदासाठी चर्चिली जात आहेत. मात्र त्याच वेळी माजी आमदार अमित घोडा यांनी विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेना उमेदवार श्रीनिवास वणगा यांच्याविरोधात बंडखोरी केल्यानंतर त्यांचे बंड शमवण्यासाठी त्यांना थेट मातोश्रीवर नेण्यात आले होते. त्या वेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमित घोडा यांना दिलेल्या आश्वासनामुळे अमिता घोडा यांचे पारडे जड असल्याचे मानले
जात आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असल्यामुळे पालघर जिल्ह्यातही निवडणुकीनंतर तोच प्रयोग राबवला जाईल, अशी चर्चा सुरू होती. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे जिल्हा परिषदेत पुरेसे संख्याबळ आहे. त्यांना अन्य पक्षांच्या अथवा अपक्षांच्या पाठिंब्याची गरज नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांच्या झालेल्या बैठकीत अन्य पक्षांकडे पाठिंबा मागण्याची गरज नाही, परंतु जर कुणी पक्ष अथवा स्थानिक आघाडी पाठिंबा देत असेल, त्यांचे स्वागत करावे, असे ठरले असल्याचे सांगण्यात आले.
पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ सदस्यांपैकी शिवसेना १८, राष्ट्रवादी १४, भाजप १२, माकप ५, बविआ ४, अपक्ष ३ तर काँग्रेस १ असे संख्याबळ आहे. शिवसेना १८ जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. सत्तास्थापनेसाठी बहुमताचा २९ हा आकडा असून राष्ट्रवादीच्या १४ जागा आहेत. त्यामुळे काँग्रेस (१) आणि जिजाऊ संघटना (१) यांची तसेच माकपा, बविआ आणि अपक्ष सदस्यांच्या पाठिंब्याची शिवसेना-राष्ट्रवादीला सत्ता स्थापन करण्यासाठी गरज लागणार नाही. बहुजन विकास आघाडीला शिवसेना जिल्ह्यातील एक नंबरचा शत्रू मानत असल्यामुळे बहुजन विकास आघाडीला महाविकास आघाडीबाहेर ठेवण्यासाठीच ही खेळी खेळण्यात आली असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
माजी आमदार अमित घोडा यांच्या पत्नी अमिता घोडा यांचे नाव जरी आघाडीवर असले तरीही भारती कामडी, वैदेही वाढाण आणि गुलाब राऊत यांचीही नावे चर्चेत आलेली असल्याने नेमकी या पदावर कुणाची निवड होते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उपाध्यक्षपदासाठी कुणाची वर्णी लागते, याविषयीही उत्सुकता निर्माण झालेली आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अद्यापही आपले पत्ते खोललेले नाहीत.
>मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीचीच सत्ता स्थापन होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्याच वेळी अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाचा निर्णय घेताना अनुभव, शिक्षण आणि कामकाज चालवण्याची क्षमता यांचा विचार केला जाऊन निर्णय घेण्याचे ठरले आहे.
- रवींद्र फाटक, पालघर जिल्हा संपर्क प्रमुख, शिवसेना.