वसई मिठागरातील लोकवस्तीवर यंदाही पुराचे सावट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 04:35 AM2020-06-20T04:35:59+5:302020-06-20T04:36:09+5:30
स्थलांतरास नागरिकांचा विरोध; प्रशासनाची कोरोनामुळे कसरत
पारोळ : यंदा वसई-विरार पाण्याखाली जाण्याचा धोका आहे. त्यामुळे वसई पूर्वेतील मिठागर मजुरांच्या वस्तीला पुराचा धोका निर्माण होणार आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास शेकडो नागरिकांना कोरोनासारख्या आपत्तीत विस्थापित करण्यासाठी महापालिकेच्या आपत्ती विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. जुलैमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची डॉक्टरांनी शक्यता व्यक्त केली आहे. कोरोना आणि पूर अशा दोन्ही आपत्तींत महापालिका प्रशासन, अग्निशमन विभाग आणि आपत्ती विभागातील कर्मचाऱ्यांना आपले काम निभवावे लागणार आहे.
वसई पूर्वेतील नवघर येथील मिठागर असलेल्या ठिकाणी सर्वसामान्य मजुरांची मोठी वस्ती आहे. दरवर्षी पुराचा पहिला फटका या वसाहतीला बसतो. त्यामुळे सुमारे ५०० च्या आसपास मजुरांना दरवर्षी अग्निशमन विभागाच्या सहकार्याने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावे लागते. यंदा पुरामुळे नागरिकांना स्थलांतरित करण्यात कोणतीच अडचण नसली तरी समोर कोरोनाचा धोका आहे. एका मजुराला जरी या विषाणूची लागण झाली आणि त्यात पुरामुळे त्यांच्यावर स्थलांतराची वेळ आली तर सर्वात मोठे संकट कोसळण्याची भीती आहे. मदतकार्य करणाºया जवानांनाही संसर्गाचा धोका पोहोचू शकतो. महापालिका प्रशासनाने मे महिन्यातच नालेसफाईसारखे काम मन लावून केले असते, तसेच नैसर्गिक नाल्यांवर झालेली अनधिकृत बांधकामे
तत्काळ निष्कसित केली असती तर ऐन पावसाळ्यात नागरिकांना जीव मुठीत घेऊन जगण्याची गरज पडली नसती.
दरवर्षी पावसात साचते पाणी मागील २० वर्षांपासून अमीर महल मिठागराच्या ठिकाणी ४५० ते ५०० लोकवस्ती आहे. या ठिकाणी दरवर्षी पाणी साचते. दरवर्षी पाणी साचल्यानंतरही येथील नागरिकांचे स्थलांतर करण्यास विरोध असतो. त्यामुळे दरवर्षी पालिका प्रशासनाचीच डोकेदुखी वाढते. नुकतेच झालेल्या निसर्ग चक्रीवादळातही प्रशासनाने बसची व्यवस्था या ठिकाणी केली होती. मात्र तेव्हाही नागरिकांनी स्थलांतर करण्यास विरोध दर्शवला.