पेल्हारपाठोपाठ उसगाव धरणही ओव्हरफ्लो, आता प्रतीक्षा सूर्या-धामणी धरणाची
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2020 07:22 PM2020-08-07T19:22:44+5:302020-08-07T19:22:50+5:30
वसई विरार शहराला पाणीपुरवठा योजने अंतर्गत उसगाव धरणातून 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असतो, त्यातच उसगाव धरणाची क्षमता 4.96 घन मिलि.मीटर इतकी आहे.
वसई- विरार शहर महापालिका हद्दीतील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे ग्रामीण वसई पूर्वेतील उसगाव धरण हे या चार दिवस झालेल्या मुसळधार पावसानं दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती वसई विरार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने लोकमतला दिली. दरम्यान वसई विरार शहराला पाणीपुरवठा योजने अंतर्गत उसगाव धरणातून 20 दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणीपुरवठा होत असतो, त्यातच उसगाव धरणाची क्षमता 4.96 घन मिलि.मीटर इतकी आहे.
परिणामी सबंध पालघर जिल्ह्यात व वसई तालुक्यात मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडल्याने वसई तालुक्यातील धरण क्षेत्रात देखील समाधानकारक पाऊस पडल्यावर गुरुवार 6 ऑगस्ट रोजी जसे पेल्हार धरण पूर्णपणे भरून वाहू लागले त्याप्रमाणे आता उसगाव धरण देखील दुथडी भरून वाहू लागल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली. एकूणच पेल्हार पाठोपाठ आता उसगाव हे सुद्धा धरण दुथडी भरून वाहिल्याने वसईकरांनी समाधान व्यक्त केले आहे.
आता प्रतीक्षा सूर्या -धामणी धरणाची ...!
मागील चार दिवस पडलेल्या पावसात वसई विरार शहराला पाणीपुरवठा करणारी पेल्हार ,उसगाव हो दोन्ही धरणे तर ओव्हरफ्लो झाली असली तरी देखील मुख्य सुर्या धामणी धरण अजूनही 37 टक्के भरण्याचे शिल्लक असून 7 ऑगस्ट रोजी पर्यँत या धरणात 62.84 % टक्के पाणी साठा आहे,तर मागील वर्षीच्या तुलनेने गतवर्षी यादिवशी हे धरण 90.29 टक्के भरले होते.त्यामुळे अजूनही समाधानकारक पाऊस धरण क्षेत्रात पडणे आवश्यक असल्याचे पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले.