आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 12:37 PM2024-08-08T12:37:21+5:302024-08-08T12:37:43+5:30

या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

food issue in the ashram school; The students presented the reality before the president of Zilla Parishad | आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

आश्रमशाळेत कच्च्या चपात्या, बेचव भाजी अन् अळणी भात; विद्यार्थ्यांनी मांडले जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसमोर वास्तव

पालघर : आश्रमशाळेतील मुलांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असून कच्च्या चपात्या, बेचव भाजी आणि अळणी भात मिळत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासमोरच दिली. या आश्रमशाळेतील मुलांच्या जेवणासाठी तालुकास्तरावरच किचन सुरू करण्यात यावे, अशी सूचना निकम यांनी केली आहे.

डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत पालघर, डहाणू, तलासरी आणि वसई अशा चार तालुक्यांतील ३३ आश्रमशाळांमधून १,७०० विद्यार्थ्यांना बोईसर-कांबळगाव येथील सेंट्रल किचनमधून दररोज सकाळचा नाष्टा व दोनवेळचे जेवण पुरविले जाते. मंगळवारी ३३२ विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयांत दाखल करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी अध्यक्ष निकम यांनी कासा येथे ग्रामीण रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली आणि रणकोळ आश्रमशाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

कांबळगाव येथील सेंट्रल किचनची पाहणी करताना विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात येणाऱ्या जेवणाची चव, प्रत कशी असते हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी अध्यक्षांनी विद्यार्थ्यांसोबत जेवण केले. यावेळी आजचे जेवण चांगले असून अन्य वेळी मिळणाऱ्या जेवणात मशिनवर बनवलेली कच्ची चपाती, पाण्यासारखी डाळ-भाजी, अळणी भात असे बेचव जेवण मिळत असल्याची भावना विद्यार्थ्यांनी दबक्या आवाजात आपल्याकडे व्यक्त केल्याचे निकम यांनी सांगितले. मध्यरात्री बनविलेले जेवण हे सेंट्रल किचनपासून सुमारे ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात असलेल्या आश्रमशाळांना वाहनातून वितरित केले जात असल्याने या अन्नावर त्याचा विपरीत परिणाम होत असावा, अशी शंका अध्यक्षांनी व्यक्त केली. 

परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश
डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ३१ आश्रमशाळांतील ३३२ विद्यार्थ्यांवर जेवणातून विषबाधा झाल्याने त्यांना विविध रुग्णालयांत दाखल केले होते. 
त्यांच्यावर योग्य उपचार करणे आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात डहाणूचे प्रकल्पाधिकारी सत्यम गांधी यांना यश आले आहे. 
३३२ दाखल विद्यार्थ्यांपैकी १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यांना संध्याकाळपर्यंत घरी सोडण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली. 

Web Title: food issue in the ashram school; The students presented the reality before the president of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.