लग्नामध्ये 11 मुलांना अन्नातून विषबाधा, पालघर तालुक्यातील किराट गावातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:38 AM2021-02-03T06:38:55+5:302021-02-03T06:39:25+5:30
Food poisoning : पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.
कासा - पालघर तालुक्यातील किराट गावामध्ये एका लग्नसमारंभात अकरा जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. संध्याकाळच्या वेळी लग्नसमारंभामध्ये ही लहान मुले थंड प्यायले आणि जेवल्यानंतर अचानक या लहान मुलांना उलटी व जुलाब सुरू झाले.
या मुलांच्या पालकांनी लगेचच सोमटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना उपचारांसाठी दाखल केले. पण तेथे काही फरक पडत नसल्याने त्यानंतर सोमटा आरोग्य केंद्रातून मुलांना दुपारी एक वाजता कासा उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यामध्ये वय वर्षे पाच ते दहा वयोगटातील मुलांची संख्या आहे. त्यामध्ये अनुष्का माळी, अंजली माळी, आयुष माळी, साहिल माळी, सलोनी माळी, सुशील माळी, प्रणिती माळी, मयांक माळी, प्राची माळी, सुनील माळी, निखिल माळी अशी या मुलांची नावे आहेत. सध्या या मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, पालघर जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे लग्नसमारंभांसह सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली होती. परंतु आता जिल्ह्याचा कोरोनामुक्तीकडे प्रवास सुरू असताना आणि लाॅकडाऊनही शिथिल झालेले असल्यामुळे जिल्ह्यात गेले दहा महिने रखडलेले लग्नसमारंभ होऊ लागले आहेत. अशाच एका लग्न समारंभात हा प्रकार घडल्याने खळबळ माजली आहे.
कोरोनासंदर्भातील नियमांचे उल्लंघन
जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने ग्रामीण भागात चिंता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी कोरोनासंदर्भातील नियमांचेही उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, विषबाधा झालेल्या काही मुलांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले असून त्यांना घरी सोडण्यात आल्याचे समजते.