संचालकात फूट, अपक्ष परेरा बॅसिनचे चेअरमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 05:53 AM2017-08-08T05:53:16+5:302017-08-08T05:53:16+5:30
शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या अग्रगण्य बॅसीन कॅथॉलिक बँकेतील सत्ताधारी आपलं पॅनेलला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हादरा बसला आहे. त्यांची पाच मते फुटल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष संचालक सचिन परेरा यांचा विजय झाला.
शशी करपे
वसई : शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या अग्रगण्य बॅसीन कॅथॉलिक बँकेतील सत्ताधारी आपलं पॅनेलला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हादरा बसला आहे. त्यांची पाच मते फुटल्याने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अपक्ष संचालक सचिन परेरा यांचा विजय झाला.
कॅथॉलिक बँकेच्या संचालकांची निवडणुकीत जून २०१५ रोजी पार पडली. यावेळी काँग्रेसचे मायकल फुर्ट्याडो आणि जनता दलाचे मनवेल तुस्कानो यांनी आपलं पॅनेल तयार केले होते. तर काँग्रेसच्याच डॉमणिक डिमेलो यांनी परिवर्तन पॅनेल मैदानात उतरवले होते. २१ संचालकांमध्ये आपलं पॅनेलचे १५, परिवर्तनचे ४ आणि अपक्ष २ संचालक निवडून आले होते. त्यावेळी तीन वर्षांपासून अध्यक्षपदावर मायकल फुर्ट्याडो आणि उपाध्यक्षपदावर ख्रिस्तोफर रॉड्रीक्स यांची निवड झाली होती. गेल्या चार महिन्यांपूर्वी उपाध्यक्ष रॉड्रीक्स यांनी आपल्या पदासह संचालकपदाचाही राजीनामा दिला होता. त्यानंतर जून महिन्यात विद्यमान संचालक मायकल फुर्ट्याडो यांचे निधन झाले होते. त्यानंतर उपाध्यक्षपदी आपलं पॅनेलचे युरी घोन्सालवीस निवडून आले होते.
मात्र, शनिवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आपलं पॅनेलमध्येच एकमत न झाल्याने फुटीची लागण झाली. अध्यक्षपदासाठी ओनील अल्मेडा यांचे नाव निश्चित मानले जात असतानाच आपलं पॅनेलमधील दुसºया गटाने अल्मेडा यांच्या नावाला विरोध करून रायन फर्नांडीस यांचे नाव पुढे केले होते. त्यामुळे पॅनेलमधील १३ संचालकांमध्ये अंतर्गत निवडणूक घेण्यात आली. त्यात अल्मेडा यांना पाच तर फर्नांडीस यांना आठ मते मिळाली. त्यामुळे आपलं पॅनेलने फर्नांडीस यांचे नाव निश्चित केले. याठिकाणी आपलं पॅनलमध्ये फुटीची लागण झाली.
दुसरीकडे, परिवर्तन पॅनेलने अपक्ष संचालक सचिन परेरा यांना पुढे करीत आपलं पॅनेलमध्ये फूट पाडण्यात यश मिळवले. परिवर्तन पॅनलकडे सचिन परेरा यांच्यासह दोन अपक्ष आणि स्वत:ची चार मिळून फक्त सहा मते होती. असे असतांनाही प्रत्यक्ष निवडणुकीत परेरा यांना तब्बल अकरा मते मिळाली. तर बहुमत असतांनाही आपलं पॅनलच्या रायन फर्नांडीस यांना आठ मते मिळाली. त्यामुळे पाच मते फुटल्याने आपलं पॅनलला शताब्दी वर्षातच मोठा हादरा बसला आहे.
बँकेचे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँकेत रुपांतर झाल्याने तीन अपत्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. त्यामुळे विद्यमान अध्यक्ष सचिन परेरा यांच्या पदाला धोका नाही, असे परेरा समर्थकांसह परिवर्तन पॅनल सांगत आहे. संचालक मंडळाची निवडणूक जून २०१५ मध्ये झाली असून त्यावेळी परेरा यांच्याविरोधात सभासदांनी रितसर तक्रार केली आहे. त्यावर सहकार आयुक्तांनी त्यांना अपात्र घोषित केलेले आहे. सहकार मंत्र्यांनी या निर्णयाला स्थगिती दिली असली आणि बँक मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक झाली असली तरी निवडणुक झाली त्यावेळच्या परिस्थितीनुसारच सहकार मंत्र्यांना निर्णय द्यावा लागणार आहे. त्यासाठी दिल्ली दरबारी न्याय मागू, असे तक्रारदार सोनल डिकुन्हा यांनी सांगितले. त्यामुळे आता सहकार मंत्री काय निर्णय देतात यावर सचिन परेरा यांचे भवितव्य अवलंबून आहे.
शताब्दी वर्ष साजरे करीत असलेल्या बँकेला सहा महिन्यांपासून धक्के सहन करावे लागत आहेत. तीन अपत्य असल्याने स्वीकृत संचालक व्हॅलेरीयन रॉड्रीक्स यांना सहकार आयुक्तांनी अपात्र ठरवले होते. त्यानंतर ख्रिस्तोफर रॉड्रीक्स यांनी सरकारी सेवेत असल्याने उपाध्यक्षपदासह संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन परेरा यांना तीन अपत्ये असल्याने सहकार आयुक्तांनी अपात्र ठरवले आहे.
परंतु सहकार मंत्र्यांनी सहकार आयुक्तांच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने परेरा यांचे संचालकपद सध्या तरी अबाधित आहे. या घटना घडत असताना १७ जूनला अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो यांचे अकस्मात निधन झाले. सहकार आयुक्तांनी अपात्र ठरवलेल्या सचिन परेरा यांना अध्यक्षपदी बसवून परिवर्तन पॅनलने सत्ताधारी पॅनलमध्ये फूट पाडण्याचे राजकारण केले आहे. शताब्दी वर्षातच संचालक मंडळातील अंतर्गत कलह उफाळून आले आहेत.