आदिवासींसाठी दिवाळी म्हणजे चवळी खाण्याचा सण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:33 AM2024-10-28T11:33:44+5:302024-10-28T11:34:52+5:30
आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात.
- अनिरुद्ध पाटील
दिवाळीचा सण आदिवासी बांधव मोठ्या उत्साहात साजरा करतात. पालघर जिल्ह्यात वारली, कोकणा, धोडिया, दुबळा, ठाकर, कातकरी, कोली मल्हार आदी जमातींचे वास्तव्य आहे. त्यापैकी वारली ही येथील प्रमुख जमात असून, दिवाळीत रंगीबेरंगी कपडे परिधान करणे, नृत्य आणि पारंपरिक खाद्यपदार्थ ‘चवळी खाण्याच्या सणाला’ विशेष आहे. शेतात पिकलेल्या नव्या धान्याबद्दल निसर्गाची कृतज्ञता व्यक्त करण्याची ही थोर संस्कृती होय. अश्विन एकादशीपासून दिवाळीला प्रारंभ होतो. शेतात चांगले धान्य पिकावे, रोगराई येऊ नये, कुटुंब, गाईगुरे सुरक्षित राहावीत आणि वाडवडिलांपासून चालत आलेली मौखिक विद्या टिकून अधिक परिणामकारक व्हावी म्हणून प्रत्येक घरातील प्रमुख ज्येष्ठ-आषाढ महिन्यात नवीन भातपेरणी करून कोलीदेवाचा सण केल्यापासून काकडी, चवळी, बोंबिल, ऊस, मुळा अशा अनेक गोष्टी अश्विन चतुर्दशीपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत वर्ज्य करतो.
आपापल्या कुळाच्या परंपरेप्रमाणे दशमी किंवा एकादशीला आदिवासी भगत म्हणजे पारंपरिक पुजारी आपापल्या कुळाचे दुरुंग पुजण्यासाठी दुरुंगावर म्हणजे डोंगरावर जातात. आदिवासींच्या दिवाळीला दुरुंग (दुर्ग/डोंगर) पूजेने सुरूवात होते. दुरुंगाला शेंदूर लागत नाही तोपर्यंत आदिवासी घरच्या कुलदेवांना नवीन शेंदूर लावला जात नाही हे विशेष! अश्विन द्वादशीला काही गावांमध्ये वाघबारस साजरी केली जाते. गावाला व गाईगुरांना सुरक्षित ठेवल्याबद्दल आभार मानले जातात. दिवाळीपर्यंत आदिवासी माणूस कुडा झाडाची पाने वापरत नाही. या दिवशी कुडा वृक्षाच्या पानात शेंदूर कालवून देवाला लावल्यावर आपल्या दैनंदिन गरजांसाठी तो कुडावृक्षाची पाने वापरू लागतो. कुलदेवांना नवीन तांदळांवर ठेवून त्यांना नवीन पिकलेली चवळी दिली जाते. यानंतर विविध गावांतून एकत्र आलेले एका कुळातील रक्ताचे बांधव मोठी मेजवानी करून तारपा नृत्यावर ठेका धरतात. दिवाळीच्या आधी येणारा आठवडी बाजार हा दिवाळीचा बाजार म्हणून ओळखला जातो.
दिवाळी बाजारात आदिवासी बांधवांची दिवाळी सणाला आवश्यक वस्तूंची खरेदी होते. या दिवशी घरात कोणी बाळाची काळजी घेण्यासाठी बालघी, गुराखी किंवा नांगर हाकण्यासाठी नांगऱ्या ठेवला असेल तर त्यासाठी नवीन कपडे घेतात. चतुर्दशीला प्रत्येक घरी मीठ घालून उकडलेली शेतातील चवळी, सुक्या बोंबलाची भाजी आणि सावेल्या किंवा पानोळ्या भाकरी ही परंपरेने चालत आलेली खाद्यसंस्कृती आहे. सावेल्या आवडीने खाल्ल्या जातात. यासाठी काकडी किसून तांदळाच्या पिठात कालवली जाते. आजकाल चवीसाठी वेलदोडे, किसलेले नारळ, जिरे इ. वस्तूसुद्धा घालतात. हे सर्व मिश्रण चाई नावाच्या वेलावर येणाऱ्या पानावर थापून शिजवले जाते. या दिवशी कुटुंबप्रमुख आई-वडील आणि कुटुंबातील भगत विद्या शिकत असणारा उमेदवार काकडी, बोंबिल आणि चवळी सेवन करत असल्याने या तीन वस्तूंना मानाचे स्थान असते.
आदिवासींमध्ये चवळी खाण्याचा रिवाज आटोपल्यावर गावागावात तारपकरी आपला तारपा सरसावून मोकळ्या जागेत येतात आणि रात्रभर तारप्यावर बेधुंद नाच चालू राहतो. तरुण-तरुणींच्या नाचण्याच्या उत्साहाला या दिवशी भरती आलेली असते. पूर्वी भाताच्या पाऊली - पेंढ्याने साकारलेली घरे असायची. घरावरच्या या पेंढ्याला कोहीट म्हणतात. प्रतिपदेला पाण्यातील प्रत्येक घरावरची थोडी थोडी कोहीट जमा करून गुरचरणातून किंवा डोंगरातून ज्या मार्गाने गाईगुरे गावात येतात त्या गाईंच्या मार्गावर पसरली जाते. जेव्हा गाईगुरे जंगलातून गावात येण्याची वेळ होते तेव्हा ही कोहीट पेटवली जाते. सर्व गावकरी मार्गाच्या दोन्ही बाजूला ठाल्या घेऊन वाजवतात. त्या आवाजाने गुरे घाबरून त्या पेटलेल्या आगीतून उड्या मारत गावात प्रवेश करतात. हा सण निसर्ग आणि आदिवासी यांचे नाते, शेतकऱ्याला मदत करणाऱ्या व्यक्ती व प्राणी यांच्याबाबतची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा होतो.