वणव्यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 12:12 AM2021-03-10T00:12:21+5:302021-03-10T00:12:27+5:30
वनविभागाकडून तपास सुरू
सुनील घरत
पारोळ : वन्यजीवांसाठी राखीव असणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला वणव्याचे ग्रहण लागले असून यात संचार करणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वणवे लागतात की लावले जातात, याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.
मुंबईच्या ऑक्सिजनची कांडी व वसई तालुक्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला दोन-तीन दिवसांपासून पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने मोठा वणवा लागला, तसेच पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे-मोठे वणवे लागले. यामुळे अभयारण्यात दिवसा धुराचे लोट उठताना दिसत आहेत, तर रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मांडवी गावाच्या समोरील बाजूने अगदी वर आगीच्या लालभडक ज्वाळा दिसत होत्या. सध्या लागत असलेल्या की लावल्या जाणाऱ्या या वणव्यांमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला मोठी हानी पोहोचत असून फुलोऱ्यावर आलेल्या काळ्या मैनेला, दाट मोहोर धरलेल्या रायवळी आंब्यांना, हाटुरणे, शिवण, तोरण आदीसारख्या रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जंगली रानमेव्यावर रोजगार मिळवणाऱ्या रहिवाशांचा रोजगार बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वसई पूर्वेतील परिसर हा मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा असलेला आहे. हा परिसर तुंगारेश्वर अभयारण्य व मांडवी वनक्षेत्र यांच्या अखत्यारीत येतो. या जंगलात अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील वनक्षेत्र परिसर नष्ट होऊन वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधीच लाकूडतोडी, अतिक्रमण यामुळे जंगलपट्ट्याचे प्रमाण कमी झाले आहे. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या भागातील जंगलपट्टा कमी होत आहे.
वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पथके तयार केली असून घनदाट जंगल असल्याने काही ठिकाणी आग विझवताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आमच्या विभागाची आठ पथके वणवा विझवण्यासाठी काम करत आहेत.
- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्रपाल
वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात असून वणवा रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने योग्य ती खबरदारी घेत वणव्यांवर उपाययोजना करावी, तसेच वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करावी.
- लक्ष्मीप्रसाद पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यावरणमित्र बहुद्देशीय संस्था