पाया बांधला पन छप्पराला पैसा नाय, दुसरा हप्ता थकल्याने ११३८ लाभार्थी उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 03:01 AM2018-04-13T03:01:39+5:302018-04-13T03:01:39+5:30
‘‘साहेब पाया बांधून न दोन अडीच महिना झाली, पण हप्ता माझे बँक खातेत अजुवारी आला न्हाय, पहिला हप्ता येधलं त पाया बांधला.
- निखील मेस्त्री
नंडोरे (पालघर) : ‘‘साहेब पाया बांधून न दोन अडीच महिना झाली, पण हप्ता माझे बँक खातेत अजुवारी आला न्हाय, पहिला हप्ता येधलं त पाया बांधला. न आथा पुढचा बांधकाम बांधाया पैसे कोठन आणायचा’’ असा प्रश्न तालुक्यातील नंडोरे ग्रामपंचायतीतल्या बसवत पाड्यातील १७-१७ वर्षात मंजूर झालेल्या एका घरकुल लाभार्थ्यांचा दुसरा हप्ता सरकारच्या उदासीन धोरणांमुळे आजतागायत आलेलाच नाही व त्याला त्यापायी झोपडी बांधून कुटुंबासह त्यात रहावे लागत आहे. तालुक्यातील ११३८ मंजूर घरकुल लाभार्थ्यां सोबत हीच स्थिती ओढावल्याची शक्यता नाकारणारी नाही.
लाभार्थ्यांना पहिला हप्ता मिळाला व त्यातून पाया बांधला की, त्यानंतर दुसरा हप्ता मिळण्यासाठी त्यांना दोन ते तीन मिहने वाट पाहावी लागते आहे. म्हणजे पंतप्रधान आवास योजना (घरकुल) त्या लाभार्थ्यांला मिळाली की, या चार टप्यात १ लाख २० हजार रुपये मिळेपर्यंत दहा महिने ते एक वर्षाचा कालावधी उलटून गेलेला असतो. आपली विवशता किंवा या योजनेतील नियमावली समजत नसल्याने हे लाभार्थी आपल्यावरील सर्व समस्या सहन करून घेत आहेत.
या बाबतीत लाभार्थ्याने ग्रामपंचायतीतल्या ग्रामसेवकाला विचारले तर तो पंचायत समितीतल्या अधिकाऱ्याकडे बोट दाखवतो. अधिकाºयाला विचारले कि, तो फोटो अपलोड झाले नसल्याचे किंवा वरून पैसे आले नसल्याचे कारण सांगतो. आणखीन पुढच्या अधिकाºयांकडे गेलो की, संगणकाकडे बोट दाखवतो व म्हणतो बघ, आवास प्रणालीवर अजून पैसेच आल्याचे दिसत नाहीत. काही वेळा पैसे आले तरी ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत नाहीत. त्याच्याही पुढे जाऊन वरिष्ठ अधिकाºयांकडे गेलो की, राज्य शासनाचा निधीच आला नाही, मनुष्यबळ नाही, या योजनेतील आॅनलाईन प्रणालीतील तांत्रिक अडचणींचा पाढा त्यांच्याकडे तयार असतो. लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत स्वत:चे बँक खाते असणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे खाते नव्हते त्यांनी जन धन योजने अंतर्गत खाते उघडले. त्यात घरकुलाचे पैसे जमाही झाले. मात्र, या खात्याअंतर्गत रक्कम काढण्याची मर्यादा असल्यामुळे ती लाभार्थ्यांना एका वेळी काढता येत नाही. परिणामी खात्यात पैसे असूनही ते न मिळाल्याच्या कारणांमुळे घरकुल अर्धवट राहतात. यातील गमतीशीर बाब अशी की या योजनेच्या आॅनलाईन प्रणालीत लाभार्थ्यांना पैसे मिळाले असल्याचे दाखिवले जाते मात्र, प्रत्यक्षात लाभार्थींच्या खात्यात दमडीही जमा होत नाही. सरकारी अनास्थेप्रमाणे घरकुल अर्धवट राहण्याला काही लाभार्थीही तितकेच जबाबदार आहेत. या योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानंतर ते पैसे वैयिक्तक कारणांसाठी ते खर्च करतात व परिणामी पैसे नसल्यामुळे हि घरकुले अर्धवट स्थितीत राहतात. यासाठी अशा प्रकारावर कुठेतरी आळा बसायला हवा.
>सहा महिन्यातील घरकुलाला लागतो वर्ष
लाभार्थ्यांनी घराचा पाया बांधला की, त्याचा फोटो घेऊन तो प्रणालीवर अपलोड केल्याशिवाय त्याचा दुसरा हप्ता मिळत नाही. घरकुलाचे हे पैसे तीस हजाराप्रमाणे चार हप्त्यात टप्याच्या कामाप्रमाणे व त्या कामाच्या फोटो अपलोडींग नंतरच मिळतात हा नियम असला तरी या तुटपुंज्या अभियंत्यांमुळे या घरांचे फोटो अपलोडींगसाठी सुमारे २ महिन्यांहून अधिक काळ जातो. परिणामी लाभार्थी या हप्त्यांपासून वंचित राहतात व ६ महिन्यात बांधून होणाºया घरकुलास वर्ष लागते ही वस्तुस्थिती आहे.
> चार जणांवर प्रचंड बोजा
जिल्ह्यासह पालघर तालुक्यातील १३३ ग्रामपंचायतींमध्ये या घरकुलाचे फोटो घेण्यापासून ते फोटो आवास प्रणालीवर अपलोड करण्याचे काम ग्रामीण गृह निर्माण अभियंते करीत असतात. मात्र, तालुक्यातील ११३८ घरांच्या कामांसाठी फक्त ४ कंत्राटी अभियंते असल्यामुळे यासाठी वेळ लागतो परिणामी लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यात अडचण निर्माण होत आहे.
या प्रक्रियेत महत्वाची भूमिका घरांचे फोटो घेणे, ते अपलोड करणे ही असते. त्यानंतरच लाभार्थ्यांना खात्यात हप्ते मिळतात व त्यासाठी हे मनुष्यबळ कमी असून दुर्गम भागात जाऊन त्यांचे फोटो घेण्यासाठी उशीर होत असल्यामुळे विलंब होत आहे.
- डॉ. प्रदीप घोरपडे, गटविकास अधिकारी (पं.स. पालघर)