साडेचार वर्षीय आरोहीची कोटीच्या कोटींची उड्डाणे, लहान वयात थक्क करणारा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 12:31 AM2019-03-27T00:31:45+5:302019-03-27T00:33:30+5:30
किड्स मेमरी रेकॉर्ड्सचे चार विक्रम नावावर नोंदवणाऱ्या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या लीलया अचूक म्हणण्याची किमया साधली आहे. ती येथील बी.एम.टी. हायस्कूलच्या नर्सरी वर्गात शिकते.
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : किड्स मेमरी रेकॉर्ड्सचे चार विक्रम नावावर नोंदवणाऱ्या वाणगाव येथील आरोही विजय पावबाके हिने आता चक्क कोटींची संख्या लीलया अचूक म्हणण्याची किमया साधली आहे. ती येथील बी.एम.टी. हायस्कूलच्या नर्सरी वर्गात शिकते.
तालुक्यातील जिल्हा परिषद गोवणे मराठी शाळेतील प्रयोगशील शिक्षक विजय पावबाके यांची आरोही ही साडेचार वर्षीय कन्या आहे. सरला आणि विजय पावबाके या आई-वडिलांनी तिला काही दिवसांपूर्वी शंभरपर्यंतचे इंग्रजी अंक शिकवण्यास प्रारंभ केला. कुशाग्र बुद्धिमत्तेमुळे तिने ते तात्काळ अवगतही केले. शिवाय दिवसभरात घरातील भिंतीवरील फळ्यावर ती स्वत: अंक लिहायचा तसेच वाचायचा सरावही करू लागली. परंतु तिचे लहान वय लक्षात घेता, शंभर पुढील अंक आताच शिकविणार नसल्याचे पालकांनी ठरवले. दरम्यान, या काळात नोटांवरील संख्या, गाड्यांचे नंबरप्लेट्स तसेच इमारतीवर लिहिलेले अंक ती वाचण्याचा प्रयत्न करीत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. त्यासह टू झीरो २०, थ्रि झीरो ३० म्हणताना वन झीरो वनटी का होत नाही असे प्रश्न तिला पडू लागले. त्यानंतर चक्क कॅलक्युलेटर किंवा कॉलसाठी मोबाइलवर नंबर डायल करतेवेळी दहाअंकी संख्या वाचता याव्यात म्हणून तिने हट्टच धरला. मग मात्र तिला पहिल्या दिवशी शंभर, दुसऱ्या दिवशी हजार, त्यानंतर लक्ष आणि त्याही पुढे जात चौथ्या दिवशी कोटी पर्यंतचे अंक शिकविण्यात आले. आश्चर्य म्हणजे ते ती अचूक म्हणूही लागल्याने पालक अक्षरश: भारावले.
बोबड्या बोलांनी काऊ-माऊच्या गोष्टी, बडबड गीते म्हणण्याच्या वयात आरोहीचा प्रवास थक्क करणारा असून आनंदी असल्याचे सांगत, यापुढे तिने आमच्या समोर मोठे चॅलेंज उभे केले आहे. त्यासाठी आम्हाला सजग, तत्पर रहावे लागत असून नवनवीन ज्ञान शिकण्याचा अभ्यास करावा लागत असल्याचे सरला बावबाके यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
इंडियाज वर्ल्ड रेकॉर्डच्या किड्स मेमरी गटात तिने पाठांतर क्षमतेच्या जोरावर यंगेस्ट टू रीड अँड रिसाईट इंग्लिश अल्फाबेट्स, मोस्ट नंबर आॅफ इमेजेस आयडेंटिफाय (१९० इमेजेस), यंगेस्ट टू रिसाईट मोअर दॅन ३० राइम्स आणि यंगेस्ट टू रिसाईट लोंगेस्ट राइम्स हेविंग २० लाईन्स या चार रेकॉर्डची नोंद चक्क वयाच्या दुसºया वर्षी केली आहे.
आरोहीचे वडील विजय पावबाके यांची प्रयोगशील शिक्षक म्हणून ओळख आहे. त्यांनी आजतागायत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक रेकॉर्डसना गवसणी घातली आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन ती सुद्धा मार्गक्र मण करीत आहे. पालकांनी सजग राहून घरच्याघरी बालकांच्या अध्ययन क्षमतांचा विकास करण्यास प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे.
- सरला पवबाके
(आरोहीची आई)