वसईतील एटीएम हॅक, आठ दिवसांत चार जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 05:49 AM2018-02-01T05:49:11+5:302018-02-01T05:49:27+5:30

वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.

Four ATM hacks in Vasai, four in eight days | वसईतील एटीएम हॅक, आठ दिवसांत चार जणांची फसवणूक

वसईतील एटीएम हॅक, आठ दिवसांत चार जणांची फसवणूक

Next

वसई : वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.
बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून २० जानेवारीला पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून २३ जानेवारीला पैसे काढण्यात आले आहेत. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक नायजेरीयन सीसीटीव्हीत दिसला आहे.
मारिया डायस, हेलन आणि अशरफ शेख या तिघांच्या खात्यातून मंगळवारी पैसे काढले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. मारिया यांच्या खात्यातून १०हजार ५०० , हेलन यांच्या खात्यातून ३८ हजार आणि अशरफ यांच्या खात्यातून ३३ हजार काढण्यात आले आहेत.
त्यांनी बँक आॅफ बडोदाच्या तामतलाव येथील एटीएममधून वेगवेगळ््या वेळी शनिवारी पैसे काढले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढले गेले. तसा मेसेज आल्यानंतर त्यांनी बँकेत विचारणा केली असता भाईंदर येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
वसईतील चंद्रशेखर खानिवडेकर यांच्याही खात्यातून १ लाख ४० हजार रुपये काढण्यात आले आहेत. २० जानेवारीला त्यांनी तामतलाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यानंतर त्यांच्या कार्डाची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून १ लाख ४०हजार रुपये मीरा रोड आणि मुंबईतील विविध एटीएम मधून काढण्यात आले. त्यांनीही तक्रार केली आहे. ज्यावेळी एटीएममधून पैसे काढले त्यावेळी त्यांचा अकाउंट नंबर आणि पासवर्ड हॅक करण्यात आला असावा असा अंदाज आहे. पहिल्या तिघांच्या खात्यातून पैसे काढतांना भाईंदर येथील एटीएम सेंटरमध्ये एक नायजेरियन आढळून आला आहे. त्यामुळे यामागे नायजेरियन टोळी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Four ATM hacks in Vasai, four in eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.