आश्रमशाळांच्या चार इमारती पडूनच!
By Admin | Published: December 22, 2016 05:36 AM2016-12-22T05:36:19+5:302016-12-22T05:36:19+5:30
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या चार आश्रमशाळांच्या नव्या इमारती विद्युत फिटिंग न झाल्याने गेली दोन वर्षे
हुसेन मेमन / जव्हार
जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत बांधलेल्या चार आश्रमशाळांच्या नव्या इमारती विद्युत फिटिंग न झाल्याने गेली दोन वर्षे पडून आहेत. एकीकडे सध्याच्या मोडकळीस आलेल्या आश्रमशाळा, विद्यार्थी नरकयातना सहन करीत शिक्षण घेत आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाच्या मुर्दाडपणामुळे या इमारती धूळखात आहेत. आदिवासी विकासमंत्र्यांच्या जिल्ह्यातच हा विरोधाभास आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. तरीही त्यांना या भीषण वास्तवाचे कोणतेही सुखदु:ख नाही.
या प्रकल्पांतर्गत विनवळ, साखरे, दाभेरी, देहरे या चार आश्रम शाळेतील वर्गखोल्या आणि निवास व्यवस्था यांची दुरवस्था झाल्याने या आश्रम शाळांना नवीन ईमारतीची अत्यंत गरज होती. या दृष्टीने शासनाने या शाळांच्या इमारतींना मंजुरी देऊन त्या १२ कोटी खर्च करून त्या तातडीने बांधल्या.
मात्र दोन वर्ष होवूनही या आश्रम शाळेतील इमारती उदघाटनाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या विनवळ, साखरे, दाभेरी, देहरे या आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच थंडीचे दिवस असल्याने मोडकळीस वर्गात थंडी वा-यात कुडकुडत बसून शिक्षण घ्यावे लागत आहे. जव्हार आदिवासी विकास प्रकल्पातील या चार आश्रम शाळांचा सकाळी शाळा आणि संध्याकाळ व रात्री वसतीगृह असा दुहेरी वापर करावा लागत आहे. त्यातही ओल आलेल्या खोल्या, तुटके, गळके छप्पर, खिडक्या, दरवाजे बेपत्ता अशी अवस्था आहे. त्यामुळे पावसाळ्यात तर या आश्रम शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची अत्यंत दयनीय अवस्था होत असते. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था धड नाही. आंघोळीसाठी गरम पाणी करणारे सौरसंच बंदच. शौचालयांची व स्रानगृहांची दारे चोरीस, संरक्षक भिंत नाही, स्वयंपाकाची सामग्री साठविण्यास जागा नाही अशा अवस्थेत हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातील विद्यार्थीनींची अवस्था अत्यंत भयावह आहे.
आत्ताशी कुठे निघाले विद्युतीकरणाचे टेंडर
इमारत तयार होवून दोन वर्षे झालीत. परंतु लाईटची फिटिंग झाली नसल्याने अजूनही इमारतींच्या उद्घटनाची प्रतीक्षा करावी लागत आहे. आदिवासी आश्रम शाळेत निवासी राहून शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी नवीन इमारती तयार असूनही त्यांना मरणयातना सहन करीत जुनाट धोकादायक आश्रमशाळांत जिणे कंठावे लागत आहे. या बाबत जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, या आश्रम शाळांतील विद्युत फिटिंगचे टेंडर काढले आहे. या महिना भरातच विद्युत फिटिंग काम करण्यात येईल असे उत्तर बांधकाम विभाग जव्हार यांच्याकडून मिळाले आहे.