एस टी पी प्लान्टमध्ये गुदमरून चौघांचा मृत्यू; विरारच्या ग्लोबल सिटीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2024 03:57 PM2024-04-09T15:57:14+5:302024-04-09T15:58:41+5:30
चौघांचेही मृतदेह मिळाले
लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :-विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटीतील खाजगी एसटीपी प्लान्टमध्ये चौघांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली आहे. चौघांचे मृतदेह शोधण्यात मनपाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आहे. घटनेच्या ठिकाणी मनपा अधिकारी, अर्नाळा पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी पोहचले आहेत.
विरार पश्चिमकडे असलेल्या खाजगी एसटीपी प्लांटमधील चोकअप काढण्यासाठी तेथील एक कर्मचारी गेला होता. तो परत न आल्याने त्याला शोधण्यासाठी दुसरा कर्मचारी गेला. तोही परत न आल्याने तिसरा कर्मचारी गेला. तिघेही परत न आल्याने चौथा त्यांना शोधण्यासाठी गेला. अशाप्रकारे चौघेही एसटीपी प्लांटमध्ये गुदमरून मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेची माहिती मनपाच्या अग्निशमन दलाला मिळाल्यावर अग्निशमन कर्मचारी तत्काळ दुर्घटना स्थळी पोहोचून ब्रीदिंग ऑपरेटर सेट परिधान करून पाण्यात उतरले व बुडीत मृत मजुरांना बाहेर काढले. सदर दुर्घटनेत शुभम पारकर (२८), अमोल घाटाळ (२७), निखिल घाटाळ (२४) आणि सागर तेंडुलकर (२९) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगारांची नावे आहेत.
सदर घडलेली घटना ही दुःखद असून आतापर्यंत चारही गुदमरून मृत्यूमुखी पडलेल्या मजुरांचे मृतदेह मिळाल्याची माहिती अर्नाळ्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी लोकमतला माहिती दिली आहे.