तारापूरमध्ये दोन मोठ्या प्लाण्टसह चार उद्योग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:09 AM2019-12-19T00:09:25+5:302019-12-19T00:09:40+5:30
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दोन उद्योगांवर गेल्या आठवड्यात बंदची कारवाई केल्यानंतर आता विराज प्रोफाइल लिमिटेड या नामवंत स्टील ...
बोईसर : तारापूर औद्योगिक क्षेत्रातील दोन उद्योगांवर गेल्या आठवड्यात बंदची कारवाई केल्यानंतर आता विराज प्रोफाइल लिमिटेड या नामवंत स्टील उद्योगाच्या प्लाण्टसह अन्य चार उद्योगांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या ठाणे विभागाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी उत्पादन बंदच्या कारवाईची नोटीस बजावली आहे. या सर्व उद्योगांचे पाणी आणि वीज पुरवठा ७२ तासामध्ये खंडित करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत.
तारापूर येथील एल आणि जी प्लॉटमधील विराज प्रोफाइल लिमिटेड, नेटवर्क पॉलिमर प्रायव्हेट लिमिटेड (एन- ८०) औरा लॅबरोटरी या उद्योगांसह अन्य दोन उद्योगांवर पर्यावरणाच्या नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणावरून कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात दोन तर आता सहा अशा एकूण आठ उद्योगांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे. सर्व्हे झालेल्या अनेक उद्योगांवर कारवाईची टांगती तलवार असून सॅम्पलिंग, रिझल्ट व अॅक्शन अशा तीन टप्प्यांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. तारापूर एमआयडीसीमधील सामूदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे जेवढे उद्योगसदस्य आहेत त्यापैकी ५०९ उद्योगांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित उद्योगांचेही सर्वेक्षण लवकरच करण्यात येणार आहे.
विराज प्रोफाइल या दोन्ही स्टील कारखान्यातून हवा प्रदूषणासंदर्भात तक्रारी येत होत्या. सर्वेक्षण केले तेव्हा कारखान्यातून धूलीकण हवेत उडून सभोवताली मोठ्या प्रमाणात साचलेले तर हवा प्रदूषण नियंत्रण करणारे सयंत्र नादुरुस्त अवस्थेत आढळले होते. म्हणून बंदची कारवाई केली आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये तारापूर औद्योगिक क्षेत्रातील सुमारे ५०९ उद्योगांचे सर्व्हेक्षण केले आहे.
- धनंजय पाटील,
प्रादेशिक अधिकारी,
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ , ठाणे