वसईत खंडणीचे चार गुन्हे, माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:12 AM2018-04-01T03:12:22+5:302018-04-01T03:12:22+5:30
वसई : माहितीच्या अधिकारात माहिती मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी विरार, नालासोपारा आणि तुळींज पोलीस ठाण्यात एकाच रात्री चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना अटक करण्यात आली असून शिवसेना नगरसेवकाविरोधात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून नालासोपारा पोलीस ठाण्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोविंदा गुंजाळकर यांच्याविरोधात पाच लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिक्षण संस्थेच्या बांधकामाची तक्रार करून गुंजाळकर यांनी खंडणी मागितल्याची चव्हाण यांची तक्रार आहे. याप्रकरणी गुंजाळकर यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
शिवसेना नगरसेवक धनजंय गावडे यांच्याविरोधात तुळींज पोलीस ठाण्यात दोन आणि विरार पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विरार येथील बिल्डरने दिलेल्या तक्रारीवरून गावडे यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आरोपींनी पत्तीस लाख रुपयांची खंडणी घेतल्याची तक्रार करण्यात आली आहे. तुळींज पोलीस ठाण्यात गावडे यांच्याविरोधात खंडणी मागितल्याचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर भाजपा युवा मोर्च्याचे पदाधिकारी अरुण सिंग यांच्याविरोधातही तुळींज पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान, माहिती अधिकारात मागवून खंडणी मागितल्याप्रकरणी सदर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे वसई विरार परिसरात खळबळ उडाली आहे.
माहिती अधिकारामुळे अनेकजण रडारवर
वसई-विरार महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक बिल्डर गत काही वर्षांमध्ये भरडले गेले आहेत. त्यांच्या विरोधात माहिती मागवून त्यांना ब्लॅकमेल करण्याच प्रकारही उघड झाले असल्याने हा विषय संवेदनशिल बनला आहे.
जिल्हा पोलीस अधिक्षक मंजुनाथ सिंगे यांनी या प्रकरणी आवाहन करुन ज्यांच्याकडून खंडणी घेतली आहे. अशांची चौकशी होणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात विरार, नालासोपऱ्यातून तक्रारी होऊ शकतात.