चाळीचे छत कोसळून झोपेतच चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 12:22 AM2019-07-31T00:22:03+5:302019-07-31T00:22:19+5:30
सातपाटीमध्येही पडझड : पंचनामे पूर्ण
पालघर : पालघरच्या दांडेकर कंपाउंडमधील एका चाळीचे छत पहाटे कोसळल्याने गाढ झोपेत असलेल्या विमावाला कुटुंबातील ४ लोक जखमी झाले तर दुसऱ्या एका घटनेत मध्यरात्री सातपाटीमधील एका घराची भिंत कोसळून दोघे जखमी झाल्याची घटना घडली.
पालघर - माहीम रस्त्यावरील लक्ष्मी नारायण मंदिरासमोरील दांडेकर कंपाउंड या खूप वर्षांपूर्वीच्या चाळीचे छत मंगळवारी अचानक कोसळले. यावेळी घरात गाढ झोपेत असलेल्या नंदकिशोर चंद्रकांत विमावाला (६७) या रुग्णाच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. त्यांच्या पत्नी कल्पना विमावाला (६२), तसेच निपेश (३६) आणि त्याचा भाऊ जिगर (३४) हे चौघेही जखमी झाले. त्यांना प्रथम पालघरच्या ग्रामीण आणि नंतर खाजगी रु ग्णालयात दाखल केले.
अन्य एका घटनेत सातपाटी येथील अग्निमाता गणेशोत्सव मंडळात राहणारे विष्णू गोविंद पाटील (८५) यांच्या घराची भिंत तसेच छप्पर मध्यरात्री कोसळून ते स्वत: आणि त्यांची मुलगी वंदना (५५) हे दोघेही जखमी झाले. दोन्ही घटना मुसळधार पाऊस सुरू असताना घडल्या. दोन्ही घरातून मदतीसाठी हाका ऐकून शेजारच्यांनी त्यांची मदत करीत त्यांना या संकटातून बाहेर काढले. पालघरचे मंडळ अधिकारी वसावे यांनी दोन्ही घटनास्थळी जाऊन पंचनामे केले असून शासन पातळीवरून मदत मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविला असल्याचे लोकमतला सांगितले.