विरारमध्ये ४ दरोडेखोरांना अटक, दोन झाले फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 01:58 AM2017-08-02T01:58:55+5:302017-08-02T01:58:55+5:30
गुजरातहून विरारमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील चार जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मात्र अंधाराचा फायदा उचलून दोन जण फरार झाले.
विरार : गुजरातहून विरारमध्ये दरोडा टाकण्यासाठी आलेल्या टोळीतील चार जणांना विरार पोलिसांनी अटक केली. मात्र अंधाराचा फायदा उचलून दोन जण फरार झाले.
लोकेश सुरेशपाल पवार, गोळू भारत सोलंकी, फिलीशराज चरणसिंग सोलंकी, ससुराज चरणसिंग सोलंकी अशी त्यांंची नावे आहेत. हे सर्व गुजरातमधील गोदारा येथील रहिवासी असून १८ ते २३ वयोगटातील आहेत. लखन आणि भैरुसिंग अशी पसार झालेल्यांची नावे आहेत.
सोमवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास सहा सराईत दरोडेखोर विरार परिसरात दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती विरारचे पोलीस निरीक्षक युनुस शेख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकासह सापळा रचला होता. चंंदनसार परिसरात ही टोळी संशयास्पद फिरताना आढळून आली. त्यांना पोलिसांनी हटकले असता त्यांची पळापळा झाली. पोलिसांनी यावेळी चार जणांना ताब्यात घेतले. तर दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.
पोलिसांनी त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारे लोखंडी छिन्नी, हातोडा, हेक्सॉ ब्लेड, आठ फूट लांब सुताची दोरी, लोखंडी पाईप, मिरची पूड आदी साहित्य जप्त केले. तपासात गुजरातमधील सराईत दरोडेखोर असल्याची माहिती हाती लागली आहे. गुजरातसह मुंबई, पालघर आणि ठाणे जिल्हयात या टोळीने दरोडे टाकले असल्याचा संशय असून त्यांच्या अटकेमुळे आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक युनुस शेख यांनी दिली.