वेलंकनी यात्रेसाठी रेल्वेच्या ४ विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 11:08 PM2019-07-12T23:08:29+5:302019-07-12T23:08:33+5:30
दोन यात्रा स्पेशल : २६ व २९ आॅगस्टला
वसई : दक्षिणेकडील वेलंकनी (नागपट्टणम) या ठिकाणी दिनांक २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर सन २०१९ पर्यंत वेलंकनी मातेचा यात्रा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यासाठी संपूर्ण भारतातील ख्रिश्चन भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. विशेष करून महाराष्ट्रातून मुंबई, ठाणे, वसई, विरार व भार्इंदर, उत्तन येथील ख्रिश्चन भाविक हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहतात. या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची गैरसोय होत असल्याने खासदार राजन विचारे यांना माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा तसेच उत्तन येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी खासदार राजन विचारे यांची भेट घेऊन या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेमध्ये आरक्षण उपलब्ध होत नसल्याची अडचण निदर्शनास आणून दिली. त्यांनी तत्काळ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना पत्राद्वारे चार विशेष गाड्या सोडण्याची विनंती केली त्यांनी तत्काळ रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आदेश देऊन या स्पेशल ट्रेन सुरू कराव्यात, असे सांगितले.
या आदेशाची अंमलबजावणी आज मध्य रेल्वे व पश्चिम रेल्वे व दक्षिण रेल्वेने केली. त्यानुसार मध्य रेल्वे दि.२६ आॅगस्ट २०१९ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनलवरून दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी स्पेशल ट्रेन सोडणार आहे. तसेच वेलंकनीवरून दि.२९ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री १० वाजून ४५मिनिटांनी ती मुंबईकडे प्रस्थान करणार आहे व पश्चिम रेल्वेकडून दिनांक २७ आॅगस्ट २०१९ रोजी वांद्रे टर्मिनलवरून दुपारी २ वाजून ४५ मिनिटांनी सुटणार आहे. तसेच वेलंकनीवरून परतीच्या प्रवासासाठी दि.२९ आॅगस्ट २०१९ रोजी रात्री ९ वाजून ४५ मिनिटांनी मुंबईकडे प्रस्थान करणार आहे.
परतीसाठीही दोन गाड्या
परतीसाठी दि.८ आणि ९ सप्टेंबर २०१९ रोजीही दोन गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे, अशी माहिती खासदार विचारे यांना शुक्रवारी रेल्वेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या चेन्नई व इग्मोर येथील प्रवाशांना वेलंकनी येथे बस व इतर वाहनांनी जाण्यासाठीचा दहा तासांचा प्रवास वाचणार आहे.