झाईत चौदा तासांचे भारनियमन
By admin | Published: June 5, 2016 02:51 AM2016-06-05T02:51:28+5:302016-06-05T02:51:28+5:30
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावात वीज समस्येने कळस केला आहे. गावात प्रतिदिन चौदा तासाचे भारनियमन असून, मागील सहा वर्षांपासून पथदिवे पेटलेले नाहीत. याबाबत महावितरणाच्या
- अनिरुद्ध पाटील, डहाणू/बोर्डी
महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावात वीज समस्येने कळस केला आहे. गावात प्रतिदिन चौदा तासाचे भारनियमन असून, मागील सहा वर्षांपासून पथदिवे पेटलेले नाहीत. याबाबत महावितरणाच्या डहाणू कार्यालयात अनेकदा निवेदने देऊनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे संतप्त जमावाने बोर्डी उपकार्यालयात तोडफोड केल्याची घटनाही घडली होती. दरम्यान सीमाभागाला शासन हेतुपूरस्सर डावलत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्र गुजरात सीमेवर तलासरी तालुक्यात झाई बोरिगाव ग्रुप ग्रामपंचायत आहे. सागरी आणि डोंगरी भागात एकोणीस पाडे विखुरलेल्या गावची एकूण लोकसंख्या आठ हजार आहे. झाई हे महाराष्ट्रातील आघाडीचे मत्स्य उत्पादन केंद्र असून, पश्चिम घाटाच्या पायथ्याशी आदिवासी पाड्यांवर नारळ, चिकूच्या मोठ्या बागायती आहेत. मत्स्यव्यवसाय आणि शेती हे व्यवसाय वीजेवरच अवलंबून आहेत.
मात्र महावितरणकडून या भागात प्रतिदिन पहाटे ५ ते २आणि सायंकाळी ७ ते १२ अशा चौदा तासांचे भारनियमन केले जाते. त्यामुळे मत्स्य आणि शेतीशी निगडीत व्यावसायिक, कुशल व अकुशल वर्ग देशोधडीला लागले आहेत. जीर्ण खांब, लोंबकळणाऱ्या वाहिन्या यामुळे अपघाताची शक्यता नागरिकांना सतावते आहे. गंभीर बाब म्हणजे गेल्या सहा वर्षांपासून गावातील पथदिव्यांना वीज जोडलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत घेवून अंधारात चाचपडत प्रवास करावा लागतो. त्यामुळे साप, विंचू आणि श्वान दंश आदि प्रकार घडतात. या बाबत डहाणू वीज कार्यालयाकडे पाठपुरावा केल्यानंतरही आजतागायत दखल घेतलेली नाही. मात्र या गावचा दिवाबत्तीकर जिल्हा परिषदेकडून वसूल केला जातो आहे. असे ग्रामपंचायतीचे म्हणणे आहे. दरम्यान महाराष्ट्र गुजरात सीमेवरील झाई गावाला अनेक शासकीय योजनांपासून डावलले जात असल्याचा आरोप केला जात आहे.
समस्येविषयी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र डहाणू वीज कार्यालयाने आजतागायत दखल घेतलेली नाही.
- बी. काठे, ग्रामविकास अधिकारी, झाई ग्रामपंचायत
मत्स्य व शेती व्यवसाय डबघाईला आले आहेत. जीर्ण वीज यंत्रणेमुळे ग्रामस्थांच्या अडचणी वाढल्या आहेत.
- प्रकाश मंगेला
उपसरपंच, झाई ग्रामपंचायत