भोंदूबाबाला सात वर्षांची शिक्षा, दारु सोडवण्याच्या नावाखाली उकळले पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 12:30 AM2019-08-16T00:30:25+5:302019-08-16T00:31:07+5:30
वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
वाडा : तालुक्यातील तुसे येथे दारूमुक्ती केंद्र चालवणारा भोंदूबाबा आणि त्याच्या अन्य दोन भावांसह तिघांना ठाणे सत्र न्यायालयाने नरबळी तसेच अमानुष, अघोरी प्रथा आणि जादूटोणा कायद्यान्वये सात वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. नरबळी तसेच जादूटोणा कायद्यान्वये शिक्षा होण्याचा हा पहिलाच गुन्हा असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील तुसे गावातील कांतीलाल पुरूषोत्तम देशमुख हा भोंदूबाबा तुसे गावातच दारु मुक्ति केंद्र चालवत असे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक व्यसनाधीन लोकांकडून त्याने कोट्यवधी रुपयांची माया गोळा केली होती. संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील देवीदास उत्तम पानसरे हे या भोंदूबाबाकडे दारु सोडविण्यासाठी २०१० पासून येत होते. त्यावेळी त्यांच्या सोबत आलेल्या घरातील महिलांना या भोंदूबाबाने त्याच्या दारूमुक्ती केंद्रातील महादेवाच्या पिंडीजवळ बसवून ठेवले. आणि आपण जो उपाय सांगतो, तो बाहेर कोणालाही सांगितल्यास तुमचा संसार मोडेल. आणि घरातील व्यक्तींचा अपघाती मृत्यू होईल, अशी भीती त्या बायकांना घातली.
नवरा दारु प्यायल्यास त्याच्या शरीरावर गुपचूप बिबव्याच्या पेटत्या दिव्यातील तेल पाडून ते लावायला सांगितले. त्यानंतर शरीरावर फोड आल्यास दुसरीकडे उपचारासाठी न जाता आपल्याच केंद्रात आणण्याचा सल्ला दिला. या अघोरी प्रकारानंतर या भोंदूबाबाने अनेकदा गोळ्या खायला दिल्या. आणि २८ हजार ६०० रुपयांसह दर फेरीला हजारो रुपये उकळले. वारंवार, या भोंदूबाबाकडे जाऊनही आपली दारू सुटत नसल्याने आपण फसवले गेलो, याची जाणीव होऊन पानसरे यांनी आॅगस्ट २०१५ मध्ये त्याच्याविरोधात तक्रार केली.
आरोपींना ठोठावली शिक्षा
ठाणे सत्र न्यायालयात सुनावणी होऊन बुधवार, १४ आॅगस्ट रोजी सत्र न्यायालयाचे न्यायाधीश शैलेंद्र तांबे यांनी आरोपींना सात वर्ष कारावास आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी केला.