२४ महिन्यांत पैसे दुपटीचे आमिष देऊन फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 12:07 AM2021-05-02T00:07:53+5:302021-05-02T00:08:20+5:30
नालासोपाऱ्यात सात आरोपींवर गुन्हा दाखल
नालासोपारा : सोपारा गावात राहणाऱ्या ४० वर्षीय पुरुषाला व इतर साक्षीदारांना एका कंपनीत लाखो रुपये गुंतवणूक करून २४ महिन्यांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने सात आरोपींनी फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. नालासोपारा पोलिसांनी तक्रार आल्यावर शुक्रवारी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत ८ नागरिकांना फसवल्याचे समोर आले आहे.
नालासोपारातील सोपारा गावातील एसके अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या मोहम्मद हुसेन अब्दुल रहिमान नाईक (४०) व इतर साक्षीदारांची ऑक्टोबर २०१८ ते आजपर्यंत २४ लाख ९२ हजार ५१४ रुपयांची फसवणूक झाली आहे. ओंक्सझोन प्रा. लि. या कंपनीचे भागीदार नजर रसूल बालवा, अमानुल्लाह इस्माईल मोमीन, मोहम्मद आझम खान, सुनील टोणपे यांनी तसेच त्यांचे आणखीन साथीदार जावेद मोईऊद्दीन खान, ऋषी पाल, सतीश शर्मा यांनी त्यांच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. मोहम्मद नाईक व इतर साक्षीदारांना त्यांचा कसा नफा होऊ शकेल व २४ महिन्यात दुप्पट पैसे कसे मिळतील याचे आमिष दाखवले. त्याबाबत कंपनीची छापील पत्रके देऊन विश्वासात घेऊन पैसे गुंतविण्यास उत्सुक करून मोहम्मद नाईक यांचे ६ लाख १० हजार रुपये एवढी रक्कम इतर साक्षीदारांचे १८ लाख ८२ हजार ६६५ रुपये अशी एकूण २४ लाख ९२ हजार ५१४ रुपयांची फसवणूक केली.
आतापर्यंत ८ जणांना फसवल्याचे समोर आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून काही लोकांना फसवले असल्याची शक्यता असून त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
- हिरामण भोये,
तपास अधिकारी आणि सहायक पोलीस निरीक्षक, नालासोपारा पोलीस ठाणे