जमिनीत गाडलेल्या पुरातन सोन्यांच्या नाण्यांची स्वस्तात विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 08:45 PM2022-08-27T20:45:18+5:302022-08-27T20:50:11+5:30
मुंबईतील एका सोनाराची केली फसवणूक. सोन्याची पानं देऊन दिली पितळेची पानं.
मंगेश कराळे
जमिनीत गाडलेले पुरातन सोन्यांची नाणी स्वस्तात दरात विक्री करण्याच्या बहाण्याने फसवणूक करणाऱ्या चार आरोपींना गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी शुक्रवारी अटक केले आहे. या गुन्ह्याचा तपास व चौकशी करत त्यांचे कोणी साथीदार आहेत का याचा शोध घेत आहेत.
कांदिवलीच्या महावीर नगरमधील व्यापारी वसंत आराधना टॉवरमध्ये राहणारे सुनील चोक्सी (६४) यांची सोन्याच्या नावावर २५ जुलैला फसवणूक झाली होती. आरोपीने त्यांना वसईच्या पंचवटी जवळील भाजी मार्केट येथे त्याच्या जवळ ५ किलोचे सोन्याची पाने असल्याचे सांगितले. त्यांच्या विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १२ लाख रुपये रोख रक्कम घेऊन सोन्याची पाने न देता पितळेची पाने देऊन फसवणूक केली होती. वालीव पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्या गुन्ह्यांची वाढ झाली होती. सदर गुन्ह्यांची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठांनी गुन्ह्यांना आळा व आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी वेगवेगळी पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व महितीदाराने माहिती दिल्यावर ती प्राप्त करून घेतली. आरोपी विशाल राय (१९), संजू राय (२७), शिवराम माली (५७) आणि मीना सोलंकी (४५) यांना अंदाजे ५ किलो वजनाच्या पिवळ्या रंगाचे बनावट सोन्याचे पाने, मनी व मण्यांची माळ अशा मुद्देमालासह पकडले आहे.
माहिती मिळाल्यावर सापळा रचून चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. आरोपींचा ताबा तपास व पुढील चौकशीसाठी वालीव पोलिसांना देण्यात आला आहे.
प्रमोद बडाख
(पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, युनिट तीन)