डहाणूत विद्यार्थिनींकरिता मोफत बससेवा सुरू; मानव विकास योजनेतून १४ बस पुरवल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:58 AM2021-01-30T00:58:59+5:302021-01-30T00:59:13+5:30
शाळांच्या वेळापत्रकानुसार बसचे नियोजन
बोर्डी : शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार बुधवारपासून ५वी ते ८वी इयत्तांचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यामुळे या इयत्तांच्या विद्यार्थिनींकरिता डहाणू बस आगारातर्फे मानव विकास योजनेअंतर्गत विविध मार्गांवर बस फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. मानव विकास योजनेतून विद्यार्थिनींकरिता मोफत सुविधा उपलब्ध केली आहे. याकरिता डहाणू आगाराला १४ विशेष निळ्या रंगाच्या बसेस उपलब्ध केल्या आहेत. या आगारातून कासा, तलासरी, तारापूर आणि बोर्डी या मार्गांवर या बसेस धावतात.
डहाणू बस आगाराकडून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील शाळा आणि महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना घर ते शाळा आणि शाळा ते घर अशी प्रवासाची सवलत दिली जाते. शाळांकडून विद्यार्थिनींची माहिती व वेळापत्रक मिळाल्यानंतर आगाराकडून रविवार आणि सार्वजनिक सुट्टी वगळता ही सेवा दिली जाते. दरम्यान, पहिल्या टप्प्यात ९वी ते १२वी इयत्तांचे वर्ग सुरू झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात २७ जानेवारीपासून ५वी ते ८वीचे वर्ग सुरू करण्यात आले. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पाससेवा व विद्यार्थिनींना विनामूल्य सेवा देण्याकरिता शिक्षण विभागासह झालेल्या बैठकीत नियोजन केले होते.
शाळांच्या मागणीनुसार बसेसची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पासेस उपलब्ध केले जातील.
- अनिल बेहेरे, डहाणू आगार व्यवस्थापक