ज्येष्ठ नागरिकांना मोफत पास योजना म्हणजे निव्वळ निवडणुकीचे गाजर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 01:08 AM2020-01-10T01:08:13+5:302020-01-10T01:08:19+5:30
वसई-विरार महानगरपालिकेकडून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास वितरण योजना सुरू करण्यात आली आहे.
वसई : वसई-विरार महानगरपालिकेकडून शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत पास वितरण योजना सुरू करण्यात आली आहे. महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या नगरसेवकांच्या कार्यालयामधून या मोफत बससेवा पासचे वितरण सध्या सुरू आहे.
विशेष म्हणजे, ही मोफत पास सेवा व त्यावरील मुदत ही जानेवारी ते मार्च अशी फक्त ३ महिन्यांचीच असल्याने येथील ज्येष्ठ नागरिकांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भाजपनेही या योजनेवर टीका केली आहे. भाजपचे वसई रोड मंडळाचे अध्यक्ष उत्तम कुमार यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही योजना संपूर्णपणे फसवी असून वसई-विरार महानगरपालिकेच्या एप्रिल-मेमध्ये होऊ घातलेल्या मनपा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ज्येष्ठ नागरिकांची मते कशी मिळवता येतील व पावसाळ्यात वसई-विरारच्या नागरिकांचे जे हाल व नुकसान झाले, त्यापासून ज्येष्ठ नागरिकांचे मन वळवण्यासाठीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
या पाससंबंधी ज्येष्ठ नागरिकांनी हे पासेस फक्त तीन महिन्याचेच का, असे अधिकाऱ्यांना विचारले असता अधिकाऱ्यांकडून ३ महिन्यांनंतर स्मार्ट कार्ड दिले जाईल, असे सांगण्यात आले. यावर काही ज्येष्ठ नागरिकांनी मग आताच का स्मार्ट कार्ड दिले नाही? एवढी कोणती घाई होती? असा प्रतिप्रश्न केला आहे. उत्तम कुमार यांनी ही योजना कशा प्रकारे फसवी आहे याचे उदाहरण देताना, हा पास फक्त वसई-विरार महापालिका हद्दीपुरताच लागू असल्याने या पासच्या माध्यमातून पालिकेच्या हद्दीबाहेर जाणाºया एकाही बसमधून मोफत प्रवास ज्येष्ठ नागरिकांना करता येणार नाही, असे सांगितले.