झाई-वेवजी फेब्रुवारीअखेर खुला
By admin | Published: February 23, 2017 05:29 AM2017-02-23T05:29:48+5:302017-02-23T05:29:48+5:30
येथील झाई ते वेवजी या दहा किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात
बोर्डी : येथील झाई ते वेवजी या दहा किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अंतिम टप्यात आले आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील उपेक्षित आदिवासी गावांमध्ये रस्त्यांचे जाळे निर्माण करून त्यांना विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनेद्वारे हे रस्ते बनविले जात आहेत. त्यानुसार महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई ते वेवजी या प्रमुख जिल्हा मार्गावर सुमारे दहा किमी लांबीच्या डांबरी रस्त्याची बांधणी फेब्रुवारी अखेरीस पूर्ण होणार आहे. या रस्त्यांवर विविध ठिकाणच्या मोऱ्यांची बांधणीही करण्यात आली आहे.
या रस्त्याच्या बांधणीसाठी ३ कोटी ३६ लाख रुपये खर्च करण्यात आला असून जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने काम केल्याची माहिती प्रोजेक्ट इंजिनियर ए. डी. पटेल यांनी दिली. येथील प्रमुख राज्य मार्गावरील झाई सागरी पोलीस चौकी, बोर्डी रोड रेल्वे स्थानक ते बोरिगाव घाटातून वेवजी मार्गे नारायण ठाणा पोलीस चौकीपर्यंतचे हे अंतर आहे. पुढे हा रस्ता सांजण ते उधवा या राज्य मार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेले येथील आदिवासी विकासाच्या मूळ
प्रवाहात येणार असल्याने ते सध्या अत्यंत समाधानी झालेले आहेत. (वार्ताहर)