माकपाचा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By admin | Published: July 21, 2015 05:00 AM2015-07-21T05:00:17+5:302015-07-21T05:00:17+5:30
जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था तसेच येथे कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
जव्हार : जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळांची दयनीय अवस्था तसेच येथे कायमस्वरूपी शिक्षक नसल्याने शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्याविरोधात सोमवारी माकपाच्या वतीने जव्हार बस स्थानक ते गांधी चौक, यशवंतनगर असा मोर्चा काढण्यात आला. या वेळी धोधो पाऊस पडत असतानाही पालकांनी मोठी हजेरी लावली होती.
जव्हार प्रकल्पातील आश्रमशाळेत अध्यापन करण्यासाठी शिक्षकांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. वांगणी शाळेत पहिली ते दहावीपर्यंत एकूण ५०३ विद्यार्थी निवासी शिक्षण घेत आहेत. परंतु तिथे मुख्याध्यापक व अधीक्षक नाहीत. त्यामुळे शाळेत मुलाला पाठवू कसे असा प्रश्न पालकांना पडला आहे. तर जव्हार, मोखाडा या तालुक्यांतील शाळांचा निकाल चांगला लागला असला तरी अनेक विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशासाठी वणवण भटकत आहेत. माकपा व पालक यांच्या मोर्चादरम्यान जून महिना गेला व जुलै महिना उलटायला आला तरी पाऊस पडत नसल्याने भात, नागली, वरई, तूर, उडीद, राब सुकून गेले आहेत. त्यामुळे पंचनामा करून कोरडा दुष्काळ जाहीर करा. प्रत्येक आश्रमशाळेतील रिक्त पदे भरा, रेशनकार्डधारकांना धान्य वेळेत द्या, मजुरांना रोजगार द्या, अशा विविध मागण्या या मोर्चादरम्यान करण्यात आल्या आहेत.
या वेळी मोर्चात आश्रमशाळांची परिस्थिती गंभीर आहे, हे लक्षात घेऊन प्रकल्प अधिकाऱ्यांची पदे त्वरित भरावी व वांगणी आश्रमशाळेत मुख्याध्यापक व अधीक्षकपद लवकर भरावे, असा इशारा मोर्चाचे नेतृत्व करणारे कॉ. रतन बुधर यांनी दिला आहे. या वेळी पं.स. सदस्य कॉ. यशवंत घाटाळ, पं.स. सदस्य कॉ. लक्ष्मण जाधव, जिल्हा कमिटी सदस्य कॉ. शिवराम घाटाळ, तालुकाध्यक्ष यशवंत बुधर, कॉ. शांतीबाई खुरकुटे, दसू जाब, विजय शिंदे, नवसू बुधर, लक्ष्मण पारधी तसेच शेकडो कार्यकर्ते व पालकवर्ग उपस्थित होता. (वार्ताहर)