टीडीसीविरोधात उद्या मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:14 AM2017-07-24T06:14:05+5:302017-07-24T06:14:05+5:30
शैक्षणिक पात्रता,जात संवर्ग,वय,एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व व्यवस्थपकांच्या
हितेन नाईक/ लोकमत न्यूज नेटवर्क
पालघर : शैक्षणिक पात्रता,जात संवर्ग,वय,एकूण सेवा या निकषांच्या आधारे पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक व व्यवस्थपकांच्या नातेसंबंधामधील कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती अवैधरित्या देण्यात आल्याची न्यायालयीन चौकशी व्हावी या मागणीसाठी जिजाऊ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार २५ जुलै रोजी बँकेचे सभासद व अन्य संबंधितांचा मोर्चा काढणार आहेत.
सर्वसामान्यांची बँक म्हणून ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची ओळख असून राज्यात ती क्रमांक दोन ची बँक आहे. नोटा बंदीच्या काळात राज्यात सर्वात जास्त नफा आमच्या बँकेला झाल्याचे बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी लोकमतला सांगितले. बँकेच्या ६६ शाखा असून सर्वसामान्य गरीब, शेतकरी, मच्छीमार, कामगार, सहकारी संस्था, पतपेढ्या, इ. ची बँक म्हणून ती ओळखली जाते. या बँकेची उलाढाल साडेसात हजार कोटींची असून वरवर ही बँक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे दिसत असले तरी या बँकेच्या संचालकांविरोधात गैरकारभाराचे आरोप होऊ लागले आहेत. नाबार्ड आणि सहकार खात्याच्या पथकानेही तिच्या कारभाराबाबत गंभीर ताशेरे ओढले आहेत. योग्यतेचे निकष डावलून आपल्या मर्जीतील कर्मचारी, नातेवाईक, आर्थिक रसद पुरविणाऱ्याच पदोन्नती दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी राज्यपाल, मुख्यमंत्री, सहकारी विभागाचे सचिव, उपनिबंधक ठाणे, यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकांनी मुख्य कार्यालयाच्या परिसरात राहणे गरजेचे असताना रोज ठाणे ते कुडूस अशा प्रवासासाठी इनोव्हा गाडी वापरणे, सोबत चालक,शिपाई दिमतीला तसेच संचालकांना फिरण्यासाठी महागड्या दराने गाड्या भाड्याने घेण्यात आल्या असून चालकाचा पगार, डिझेल व गाड्यांच्या मेंटेनन्सचा खर्च ही बँकेला सोसावा लागत असल्याने ही सर्वसामान्य व गरीब शेतकऱ्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या सोसायटी कर्जासाठी, सर्वसामान्यांना लागणाऱ्या कर्जासाठी असंख्य कागदपत्रे मागणारी व त्यासाठी त्यांना फेऱ्या मारायला लावणारी ही बँक गाड्यांच्या भाड्यावर लाखो रुपयांचा चुराडा करीत आहे अशी तक्रार केदार चव्हाण यांनी ही विभागीय सहनिबंधक ठाणे यांच्या कडे केली आहे.
ठाणे जिल्हा बँकेत झालेल्या पदोन्नतीच्या भ्रष्टाचारा बाबत बँकेचे संचालक देविदास पाटील यांचे मेव्हणे प्रवीण घाणे हे १ सप्टेंबर २००८ ला बँकेत रुजू झाले व त्यांना ३ जानेवारी २०१२ ला तात्काळ वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. मात्र त्याच बँकेतील भगवान फसाळे हे घाणे च्या अगोदर १ जून २००६ ला बँकेत रुजू होऊनही त्यांना पदोन्नती मिळाली नसल्याची बाब तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. सुरेश डोबरे, राजाराम भाबर, सुधाकर शेळके, अरुण पाटील इ. सह अनेक पात्र कर्मचाऱ्यांना आजही पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात आले आहे. अशा प्रकारच्या तब्बल ३५ संचालकांच्या नातेवाईकांची पदोन्नती झालेली असल्याचे तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिले आहे. अन्य बाबींमध्ये मागील १० वर्षामधील बँकेतील भरती, पदोन्नती, कर्मचारी बदली, बोनस, जमीनखरेदी, बँक शाखा दुरुस्ती, स्टेशनरी छपाई, इ.मध्ये झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराची न्यायालयीन चौकशी करणे, सेवाजेष्ठते नुसार पदोन्नती देण्यात येऊन ११७ पदोन्नती रद्द करण्यात याव्यात. बँकेच्या संचालक व व्यवस्थापकांच्या परदेश दौऱ्याची न्यायालयीन चौकशी करावी या मागणीसाठी २५ जुलै रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला ग्रुप ग्रामपंचायत मोह बुद्रुक,विक्रमगड नगरपंचायत, उपराळे ग्रामपंचायत इ. अनेक ग्रामपंचायतींनी, संघटनांनी, अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी पाठिंबा दर्शविला
आहे.
१५ कोटींची पाठविली नोटीस
बँकेत सुरु असलेल्या अनेक गैरव्यवहाराची बिंग फोडून गरीब,सर्वसामान्य गुणवंत तरु णांना या बँकेत नोकरीची संधी मिळवून देण्याचा माझा प्रयत्न आहे. आम्हाला अद्याप कुणाचीही कसलीही नोटीस मिळालेली नाही.
-निलेश सांबरे - अध्यक्ष-जिजाऊ सामाजिक संस्था, झडपोली.
मुलाखती घेऊन निकषांमध्ये बसणाऱ्या पात्र उमेदवारानाच पदोन्नती दिली गेली आहे. बँकेत कुठलाही गैरव्यवहार झाला नसून तिला बदनाम करण्याचा हा डाव आहे. आम्ही आरोप करणाऱ्यांना १५ कोटीच्या अब्रु नुकसानीची नोटीस पाठवली आहे.
- राजेंद्र पाटील, अध्यक्ष ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.