वाडा प्रांत कार्यालयावर मोर्चा
By Admin | Published: December 22, 2016 05:23 AM2016-12-22T05:23:36+5:302016-12-22T05:23:36+5:30
राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा
वाडा : राज्य व केंद्रातील सत्ताधारी भाजपा सरकार गोरगरिबांच्या जमिनी काढून मोठ्या भांडवलधारांच्या घशात घालत असल्याचा आरोप करून आपल्या विविध मागण्यांसाठी कम्युनिस्टांनी प्रांत कार्यालयावर आज मोर्चा काढला.
भिवंडी-वाडा-मनोर महामार्गाच्या चौपदरीकरणात जमिनी गेलेल्यांना तत्काळ नुकसानभरपाई देऊन रस्त्यावरील खड्डे भरा, वरकस जमिनी कसणाऱ्या कुळांची पीकपाहणी करून फेरपंचनामे करा, गाव नमूना १४ भरून पिकांची नोंद करा, ग्राहकांना दिली जाणारी भरमसाट वीजबिले तत्काळ बंद करा तसेच प्रलंबित वीज प्रकरणे मंजूर करा, घरकुल लाभार्थ्यांची पिळवणूक बंद करा, वाडा शासकीय रूग्णालयातील परीचारिकांचा हलगर्जीपणा बंद करून रूग्ण व नातेवाईक यांना सलोख्याचे वागणूक देऊन, तत्काळ रुग्णवाहिकांची व्यवस्था करा, शाळा व अंगणवाडीच्या इमारतीचे तत्काळ नूतनीकरण करा, नळपाणी योजना तात्काळ पूर्ण करा, रोजगारहमी योजनेची अंमलबजावणी करा, वाडा शहरात जागोजागी शौचालयांची उभारणी करा अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या.
यामोर्चात राज्य कमिटी सदस्य कॉ. सुनील धानवा, कॉ. प्रकाश चौधरी, कॉ. चंदू धांगडा, कॉ. जगन म्हसे, कॉ. किरण गहला, कॉ. दामोदर बात्रायांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)