मार्गशीर्ष महिन्यामुळे पूजेसाठी फळांचे भाव वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 12:47 AM2019-11-28T00:47:30+5:302019-11-28T00:47:51+5:30
मार्गशीर्ष महिन्यात शेवंतीच्या फुलांबरोबर फळांनाही मोठी मागणी असते. पूजेला पाच फळे ठेवण्याची परंपरा असल्याने फळांचे दर वाढतात.
ठाणे : मार्गशीर्ष महिन्यात शेवंतीच्या फुलांबरोबर फळांनाही मोठी मागणी असते. पूजेला पाच फळे ठेवण्याची परंपरा असल्याने फळांचे दर वाढतात. फुलांमध्ये शेवंतीने शंभरी गाठली आहे. फळांमध्ये मोसंबीने ३००, तर चिकूने शंभरी पार केल्याचे ठाण्याच्या बाजारपेठेत दिसून येत आहे.
उद्या मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे. यानिमित्ताने बुधवारपासून ठाण्याच्या बाजारपेठा फुले, फळांनी सजल्या आहेत. ग्रामीण भागांतून छोटेछोटे विक्रेतेही यानिमित्ताने फुलांची विक्री करताना दिसून येत आहे. तर, सकाळच्या वेळेस जांभळी मार्केट येथे रस्त्याच्या कड्याला पाच फळांचा वाटा घेऊन आदिवासी भागांतील महिला येत आहेत. फुलांमध्ये शेवंतीचा आधी दर ५० ते ६० रुपये किलो होता, आता हा दर ८० ते १०० रुपये किलो आहे. झेंडू आधी ३० ते ४० रुपये किलो तर आता ६० ते ७० रुपये किलो आहे. शेवंतीच्या वेण्याही महागल्या असून या वेण्याच २० ते २५ रुपयाला एक याप्रमाणे मिळत आहेत. थंडीत गुलाबाची आवक घटल्याने त्याचे दर दुप्पट झाले असल्याचे हारफुलांच्या विक्रेत्या जयश्री काळे यांनी लोकमतला सांगितले. आधी गुलाबाचा एक बंडल ५० ते ६० रुपये याप्रमाणे मिळत होता. आता हे बंडल १०० ते १५० रुपये बंडलप्रमाणे मिळत आहे. फळांमध्ये पूजेसाठी सफरचंद, डाळिंब, मोसंबी, संत्री, पेरू, पेर या फळांना जास्त मागणी आहे. मोसंबी आणि चिकूचा सिझन नसल्याने या दोन्ही फळांचे दर वाढल्याचे फळविक्रेते धीरज गुप्ता यांनी सांगितले.