लष्करी प्रशिक्षणासाठी कनिका राणे सज्ज, निवांत आयुष्य सोडून देशासाठी पत्करला खडतर मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 12:45 AM2019-08-15T00:45:18+5:302019-08-15T02:41:07+5:30
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला.
- धीरज परब
मीरा रोड : २९ वर्षांच्या कनिका मूळच्या जबलपूरच्या. त्यांची आई मात्र धुळ्याची. आई - वडिलांची बँकेतील नोकरी असल्याने त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या ठिकाणी झाले. त्यांना एक मोठी बहिण आणि एक लहान भाऊ. कनिका यांना लहानपणापासूनच देशासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छा होती. अभ्यासात हुशार असणाऱ्या कनिका यांनी आयटी क्षेत्रात अभियंत्याची पदवी प्राप्त केली. पदवी परीक्षेत त्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गूण मिळवले होते.
कनिका यांना सैन्यदलाचे नेहमीच आकर्षण राहिले आहे. सैनिकांबद्दल त्यांच्या मनात नेहमीच एक आदर आणि अप्रुप असायचे. यामुळेच कौस्तुभ यांच्याशी २०१४ साली त्यांचा विवाह झाला. कौस्तुभदेखील देशप्रेमाने भारावलेले होते. २०१० साली सशस्त्र दलासाठीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर २०११ मध्ये कौस्तुभ लेफ्टनंट पदावर सैन्यात रुजू झाले होते. त्यानंतर कॅप्टन व मेजरपदी कौस्तुभ यांना बढती मिळाली. गेल्या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनी कौस्तुभ यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पदक देऊन गौरवण्यात आले होते. कौस्तुभ पदक मिळाल्यावर कनिका गहिवरल्या होत्या.
कौस्तुभच्या यशामुळे कनिका खूपच आनंदात होत्या. कुटुंबीयांना भेटून काश्मिरच्या सीमेवरील गुरेज सेक्टरमध्ये कर्तव्यावर गेलेले मेजर राणे रात्री उशिरा वा वेळ मिळेल तसा घरी संपर्क करुन आपली खुशाली कळवायचे. लहानगा अगस्त्य काय करतोय, याची आवर्जून विचारपूस करायचे.
मेजर कौस्तुभ हे गेल्या वर्षी ६ आॅगस्टच्या मध्यरात्री काश्मिर सीमेवरील गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरी करणाºया अतिरेक्यांना कंठस्रान घालताना शहीद झाले. सकाळी जेव्हा ही माहिती आली, तेव्हा राणे कुटुंबीय सुन्न झाले. एकुलता एक तरुण मुलगा गमावल्याचा आई वडिलांना धक्का बसला होता, तर लग्नाला अवघी चार वर्षे झालेली आणि लहानगा अगस्त्य पदरी असताना कोसळलेल्या दु:खामुळे कनिकादेखील हेलावल्या. देशाच्या शूर सुपुत्रास लष्करी इतमामात शेवटचा निरोप देताना असंख्य भारतीयांचे डोळे पाणावले होते. कौस्तुभ यांच्या पार्थिवास त्याच्या वडिलांनी अग्नी दिला, तेव्हा कनिका यांनी सोबत अगस्त्यला कडेवर घेतले होते. तो प्रसंग आजही अनेकांच्या डोळ्यासमोरुन हललेला नाही. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही कनिका निश्चल होत्या. वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी मेजर कौस्तुभ यांनी देशासाठी हौतात्म्य पत्करले.
उच्चशिक्षित कनिका यांनी यापूर्वी ६ ते ७ वर्षे खाजगी क्षेत्रात नोकरी केली होती. पण कौस्तुभ यांच्या हौतात्म्यानंतर त्यांनी सैन्यदलात भरती होण्याचा मनोमन निर्धार केला. वयाच्या अवघ्या दुस-याच वर्षी पित्याचे छत्र हरपलेल्या अगस्त्यला आईची सावली हवी होती. पण जसे पती कौस्तुभला देशहितासमोर सर्व गौण होते. तसाच विचार कनिका यांनी पुढे नेण्याचा निश्चय केला. त्यांनी भोपाळच्या सशस्त्र सीमा बल अकदामीमध्ये लष्करी अधिकारी पदासाठीची परीक्षा दिली. ती परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आता ११ महिन्यांच्या लष्करी प्रशिक्षणासाठी चेन्नई येथील अधिकारी प्रशिक्षण अकादमीमध्ये येत्या आॅक्टोबरदरम्यान त्या जाणार आहेत. कुलाबा येथील लष्कराच्या वसाहतीमध्ये मुलगा अगस्त्य, आई व भावासह राहणाºया कनिका लष्करी प्रशिक्षणासाठी गेल्यावर अगस्त्यचा सांभाळ त्याचे आजी, आजोबा, मामा करणार आहेत. प्रशिक्षणानंतर कनिका लेफ्टनंट म्हणून लष्करात रुजू होतील. लष्करात कुठला विभाग मिळेल, हे त्यांच्या प्रशिक्षणानंतर ठरेल. शारीरिक क्षमता सिद्ध करण्यासाठी कनिका रोज ५ कि.मी. धावण्याचा सराव, योगा तसेच अन्य व्यायाम करीत आहेत. कौस्तुभची अपुरी राहिलेली स्वप्ने त्यांना सैन्यात जाऊन पूर्ण करायची आहेतच. पण त्याचबरोबर लहानग्या अगस्त्यला त्याच्या बाबाने देशसेवेसाठी किती मोठे बलिदान दिले, हे दाखवून देण्याची त्यांची इच्छा आहे. एक वीरपत्नी म्हणूनच नव्हे तर कनिका यांची ही ओळख प्रत्येकाला प्रेरणा देणारी आहे.
शहीद मेजर कौस्तुभ राणे यांच्या वीरपत्नी कनिका राणे सैन्यात दाखल होणार आहेत. मेजर राणे शहीद होऊन ७ आॅगस्ट रोजी वर्ष पूर्ण झाले. कनिका यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेतला. पदरात अवघ्या तीन वर्षांचा मुलगा अगस्त्य असतानाही कनिका यांनी देशहिताला प्राधान्य देत आपल्या शहीद पतीची इच्छा पूर्ण करण्यास प्राधान्य दिले. आयटी क्षेत्रात अभियंता असलेल्या कनिका यांना अनेक चांगल्या नोकऱ्यांची आॅफर होती. पैसा आणि निवांत जगण्याऐवजी त्यांनी देशासाठी सैन्य दलात जाण्याचा खडतर जीवनपथ निवडला.