मागण्यांच्या पूर्ततेसाठी ‘वयम’चा वनविभागावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 11:21 PM2019-07-02T23:21:33+5:302019-07-02T23:22:50+5:30
मंगळवारी सकाळी शहरातील गांधी चौक येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वनविभाग कार्यालयावर नेण्यात आला.
- हुसेन मेमन
जव्हार : आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ग्रामस्थ, वनहक्कधारक, वैयक्तिक वनहक्क धारक अशा शेकडो लोकांनी ‘वयम’तर्फे आयोजित मोर्चात सहभाग घेतला. मंगळवारी सकाळी शहरातील गांधी चौक येथून मुख्य रस्त्याने हा मोर्चा वनविभाग कार्यालयावर नेण्यात आला.
‘वयम’च्या कार्यकर्त्यांनी वनविभाग आणि शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चाच्या निमित्ताने काही अटी - शर्ती ठेवण्यात आल्या होत्या. त्यापैकी नवीन वनकायदा २०१९ मागे घेण्यात यावा, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी आधी पूर्ण करा, ग्रामसभा तसेच पेसा कायद्याला पूरक लोकशाही सक्षम करणारा कायदा करा, वनविभागाची चांदी करणारा इंग्रज कायदा रद्द करा आदी मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या असून जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत तोवर ‘वयम’कडून नेहमीच असहकाराचे धोरण राहील, असेही हे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे.
‘वयम’च्या व्हिडीओग्राफरला लागला शॉक
दरम्यान, ‘वयम’ संस्थेचा व्हिडीओग्राफर निलेश धायरकर या ३८ वर्षीय तरुणाचा जुन्या राजवाडा येथे उच्च दाब वाहिनीला स्पर्श झाला. त्याला शॉक लागला आणि तो ३० फूट उंचीवरून खाली पडला. यामुळे तो गंभीर जखमी झाला. प्रथम त्याला जव्हार कुटीर रु ग्णालयात दाखल केले मात्र गंभीर प्रकृतीमुळे त्याला नाशिक येथे हलविण्यात आले.
कसायला दिलेल्या जमिनीत घर बांधून ते तोडण्याचे प्रकार तसेच वनहक्क धारकांना नोटीस पाठवून त्रास देण्याचे सत्र सुरू असून हा कायदा आदिवासी विरोधात असून तो शिथिल करावा असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले असून वनविभागाची नेहेमीच दमदाटी सुरू असून हे थांबविण्याची मागणी ही करण्यात आली.