निधी मंजूर तरी बंधारे रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 03:15 AM2018-07-16T03:15:55+5:302018-07-16T03:15:57+5:30
ज्या समुद्राच्या लाटांना भेदीत मच्छिमारानी आपला मासेमारी व्यवसाय टिकवून ठेवला आहे.त्याच लाटा आज मच्छिमाराचा कर्दनकाळ ठरू पाहत आहेत.
हितेन नाईक
पालघर : ज्या समुद्राच्या लाटांना भेदीत मच्छिमारानी आपला मासेमारी व्यवसाय टिकवून ठेवला आहे.त्याच लाटा आज मच्छिमाराचा कर्दनकाळ ठरू पाहत आहेत. महाकाय लाटांनी किनारपट्टीवरील मच्छिमार कुटुंबियांची घरे उध्वस्त करून त्यांच्या उरात धडकी भरवली आहे. विशेष म्हणजे या किनारपट्टीवर संरक्षक बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर असूनही पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली भूमिपुत्रांचा बळी जाण्याची वेळ आली आहे. ही स्थिती बदलणार कधी हा भूमिपुत्रांचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.
समुद्रात आणि किनारपट्टीवर विकासाच्या नावाखाली उभ्या रहात असलेल्या अनेक विकास कामाचे विपरीत परिणाम आज सातपाटी सारख्या अनेक गावांना भोगावे लागत असून संपूर्ण किनारपट्टीवरील गावांचे अस्तित्व धोक्यात आले आहेत.
सातपाटी किनाऱ्यानजीकच्या घरांवर लाटा धडकू लागल्या नंतर २०१२ मध्ये गावाच्या पश्चिमेस ह्या लाटा थोपवून ठेवण्यासाठी १५० मीटर्स चा धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला. १६ वर्षाच्या कालावधीत तुफानी वादळवारा आणि महाकाय लाटांच्या तडाख्याने ह्या बंधाºयातील दगड बाहेर फेकले गेल्याने बंधाºयाला भगदाडे पडून त्यांची दुरावस्था झाली. नवीन बंधारा बांधून मिळावा ही कित्येक वर्षांपासूनची मागणी केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात आली. ह्या संदर्भात कोस्टल झोन प्लॅन शासनाकडे सादर झाल्या नंतर जिल्ह्यातील सातपाटी (४२५ मीटर्स), नवापूर (१५० मीटर्स), एडवण (१२५ मीटर्स), तारापूर (१३८ मीटर्स) आणि घिवली ह्या गावाच्या किनारपट्टी संरक्षक बंधाºयांना विशेष प्रकल्पाच्या मुख्य अभियंत्यांकडून मंजुरीही देण्यात आली होती. २३ मार्च २०१७ च्या महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या मुंबई येथील बैठकीत या धूप प्रतिबंधक बंधाºयाचे सर्व प्रस्ताव तपासण्यात आले होते.
हरित लवादाच्या ह्या भूमिकेचा मोठा फटका सध्या सातपाटी गावासह नवापूर, दांडी, येथील गावांना बसत आहे. १३ जुलै पासून सातपाटी गाव दहशतीच्या छाये खाली जगत असून ६ मीटर च्या वर लाटा उसळून त्या किनाºयावरील घरांवर आदळत आहेत. शिवदास पागधरे ह्यांच्या घराची मागील भिंत कोसळली असून घरात लाटा येऊ लागल्याने त्यांनी नातेवाईकाच्या घराचा आसरा घेतला आहे. दुसरी कडे उमेश विठोबा पाटील ह्यांच्या पडवितील २० पत्रे फुटले असून आपल्या नौकेतील इंजिनामध्ये भरण्यासाठी आणलेले ३०० लिटर डिझेल पाण्यात वाहून गेले आहे.गावातील सुमारे २०० ते २५० घरे बाधित झाली असून आपली घरे वाचविण्यासाठी घरातील प्रत्येक सदस्य मातीच्या गोणी, लाकडी प्लायवूड, आदी जे हातात मिळेल त्या वस्तूंचा आडोसा निर्माण करून लाटा थोपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. ह्या लाटा सोबत सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडत असल्याने मच्छीमारांच्या अडचणीत वाढ होत आहे. दोन दिवसांपासून सातपाटी गाव झोपले नसून काहींच्या घरातील चुलीही पेटलेल्या नाहीत.पंचायत समिती सदस्य मुकेश पाटील, सरपंच अरविंद पाटील, उपसरपंच वैभव पाटील, सदस्य आदी लोक मदतीसाठी हजर रहात आहेत. सेनेचे जिल्हाप्रमुख वसंत चव्हाण ह्यांनी दिलेल्या दोन पोकलेन च्या आधारे बंधाºयांची भगदाड बुजविण्या ची कामे केली जात आहेत. एवढी भयावह परिस्थिती उद्भवली असताना जिल्हा प्रशासनाचा एकही अधिकारी, एनडीआरएफ ची टीम गावाकडे ढुंकून पाहत नसल्याने मच्छिमार जितू तामोरे यांनी रोष व्यक्त केला.
>याचिकेमुळे भूमिपुत्र ठरणार सागराचे बळी?
हे बंधारे किनाºयालगत उभारण्यात येणार असल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याचा बागुलबुवा काही पर्यावरणवाद्यांनी उभा करून हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली. त्यामुळे लवादाने राज्यातील पर्यावरण विभागाला सीआरझेड शी संबंधित सर्व परवानग्या रोखून ठेवण्याचे आदेश दिले.त्यामुळे सर्व बंधाºयाना मिळालेली परवानगी आणि त्यासाठीचा निधी सध्या पडून आहे.