तलासरीतील शाळेच्या छतावर अवतरली आकाशगंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 12:39 AM2021-04-08T00:39:17+5:302021-04-08T00:39:26+5:30
आनंददायी शिक्षणाचा उपक्रम
- अनिरुद्ध पाटील
बोर्डी : तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद गिरगाव आरजपाडा प्राथमिक शाळेत वर्गखोल्यांच्या भिंती थ्रीडी इफेक्ट्स देऊन रंगवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या पाड्यावरच्या शाळेत, छतावर आणि व्हरांड्यात आकाशगंगा, अंतराळवीर आणि सूर्यमाला इ. चित्रांमुळे बोलक्या भिंतीतून आनंददायी शिक्षणाचा उपक्रम राबविला जाणार आहे.
तलासरी तालुक्यातील महाराष्ट्र-गुजरात सीमाभागात ही जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक केंद्रशाळा आहे. या शाळेतील शिक्षक विनेश धोडी यांनी त्यांचे चित्रकार मित्र जयेश वायेडा, जगदीश म्हारसे व शशिकांत खंडगुळे यांची मदत व मार्गदर्शन घेऊन सर्जनशीलतेचा प्रत्यय दिला आहे.
त्यांनी वर्गांच्या भिंती व छताला थ्रीडी इफेक्ट्स देत विज्ञान, भूगोल व गणित या विषयावर आधारित गॅलेक्सी, सौरमाला ग्रह, अंतराळवीर यांची चित्रे काढली आहेत. त्यामुुळे छतावर सौरमाला चितारली असून विद्यार्थ्यांना खगोलीय विषयाची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे.
एल अँड टी या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत, माध्यमिक शाळेला चार वर्ग खोल्या बांधून दिल्या असून हे काम अंतिम टप्प्यात आहे. वर्गाच्या भिंतींना रंगकाम तसेच शैक्षणिक चित्र तक्ते वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने रंगविण्याचे काम सुरू आहे. त्यामध्येही विशेषतः विज्ञानातील प्रयोग, कार्बन चक्र, ऑलिम्पिक चिन्ह, जीएसटी तक्ता, विस्तार सूत्रे, त्रिमितीय आकार, मोबाईल ॲप, लॉगो ट्री, हाईट मेझरमेन्ट ट्री, मत्स्यालय, पृथ्वीचा अंतर्भाग या घटकांना प्राधान्य
दिले आहे.
त्यांना नक्की आवडेल
कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या शाळा बंद असल्या तरी पुन्हा शाळा सुरू झाल्यावर त्यांना हे नक्की आवडेल, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
या चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या त्रिमितीय, अवकाशीय, क्लिष्ट संकल्पना समजण्यास अधिकच उपयुक्त ठरणार आहे. हे आनंददायी शिक्षण अन्य शाळांमध्ये उपलब्ध होण्यासाठी समाजाच्या दातृत्वाची गरज आहे.
- विनेश धोडी, शिक्षक,
जि.प. गिरगाव आरजपाडा