मनसे कार्यकर्त्यामुळे गणेश भेटला कुटुंबियांना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 02:45 AM2018-12-26T02:45:11+5:302018-12-26T02:45:35+5:30
पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सहृदयतेमुळे गणेश पुष्कर डाके या बीड जिल्ह्यातील डाळी-पिंपरी येथील मनोरुग्ण तरुणांची तब्बल सात वर्षांनी आपल्या कुटुंबियासोबत भेट झाली.
पालघर : पालघरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांनी सहृदयतेमुळे गणेश पुष्कर डाके या बीड जिल्ह्यातील डाळी-पिंपरी येथील मनोरुग्ण तरुणांची तब्बल सात वर्षांनी आपल्या कुटुंबियासोबत भेट झाली.
गणेश डाके हा आपल्या तालुक्यात गाजलेला मल्ल म्हणून सर्वत्र परिचित होता. मात्र आपण मोठ्या स्पर्धेत सहभागी होऊन मोठे नाव कमवावे या इर्षेने तो कुणालाही न सांगता आपल्या घरातून बाहेर पडला. मात्र त्याने अनेक स्पर्धात सहभागी होण्याचा प्रयत्न करूनही त्याला कुठेही संधी न मिळाल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडून तो गावोगावी भटकू लागला. घरातून तो अचानक गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी त्याला शोधण्याचे खूप प्रयत्न केले होते परंतु त्यांच्या पदरी निराशा पडत गेल्याने त्यांनी ते सोडून दिले होते.
तो अनेक वर्षांपासून मिळेल त्या वाहनाने, पायी चालत सर्वत्र भटकत होता आणि दिसेल त्या व्यक्तीकडून काही तरी खायला मागून तो आपले पोट भरीत होता. मंगळवारी पालघरचे मनसे कार्यकर्ते तुलसी जोशी यांच्या वडा-पावच्या दुकानाजवळ गणेश काही तरी खाण्यासाठी हात पसरत होता. त्यामुळे तुलशी जोशी याने त्याला खायला देऊन सहज त्याची विचारपूस केली. मात्र तो काही विशेष माहिती देत नसल्याने त्याच्याकडील पिशवी तपासून पाहिली असता त्यात त्याचे मतदान कार्ड मिळाले. त्यावर तो बीड जिल्हातील माजलगाव तालुक्यातील डाळी पिंपरीचा रहिवासी असल्याचा पत्ता मिळाला.
तात्काळ जोशी यांनी मनसे बीड जिल्हा सचिव अभिषेक गोल्हार तसेच मारु ती दुनगे यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला व तो पत्ता शोधण्याची विनंती केली. तोपर्यंत जोशी यांनी एका सलूनमध्ये नेऊन त्याचे केस, दाढी कापून त्याला आंघोळ घालून नवीन कपडेही त्याला घातले. नंतर पालघर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन पोलिसांनाही त्याची माहिती दिली. पोलिसांनी ही गणेशच्या कुटुंबियांशी बीडला संपर्क साधून त्यांना पालघरला बोलावून घेतले.
मंगळवारी गणेशचे वडील, भाऊ आणि सरपंच असे १० ते १२ लोक कार ने पालघर कडे रवाना झाले. यावेळी ते सतत तुलसी यांच्या संपर्कात राहून कृपया आमच्या गणेशला सांभाळून ठेवा, त्याला कुठेही सोडू नका असे सतत विनवीत होते. अखेर बुधवारी सर्व कुटुंबीय पालघरला पोचले.मागील सात वर्षांपासून त्याच्या विरहाने व्यथित झालेल्या कुटुंबीयांनी त्याला मिठी मारली आणि सर्व आॅक्सबोक्शी रडू लागले. त्यामुळे इथे तुलसी जोशी यांनी एका जवाबदार नागरिकाप्रमाणे तत्परता दाखवून आपल्या कुटुंबिया पासून दुरावलेल्या गणेशची भेट घडवून आणल्याबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.