गणेशोत्सवानिमित्त बोर्डीत चिकू मोदक, चिकूपासून मोदक बनविण्याचा नवा ट्रेंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 01:49 AM2017-08-29T01:49:16+5:302017-08-29T01:49:56+5:30
अनिरुद्ध पाटील
बोर्डी : मोदकांचे विविध प्रकार बाजारात उपलब्ध असतांना चिकूपासून मोदक बनविण्याचा नवा ट्रेंड बोर्डीत सुरू झाला आहे. येथील महेश चुरी यांनी ही संकल्पना मागील वर्षी प्रत्यक्षात आणली असून यंदा पालघरपासून ते थेट मुंबईची बाजारपेठही काबिज केली आहे.
चिकूचे उत्पादक असणाºया स्थानिकांनी कष्ट घेऊन विविध प्रयोगातून दीडशेपेक्षा अधिक पदार्थ तयार केले आहेत. गणेशोत्सवात मोदकाला अनन्यसाधारण महत्व लक्षात घेऊन चिकू मोदकही बाजारात आणला आहे. पाव किलोच्या पॅक मध्ये २१ मोदकांचा समावेश असून डहाणू, पालघर, विरार आणि मुंबई येथील ग्राहकांना ते उपलब्ध झाले आहेत.
बोर्डी गावातील महेश चुरी हे व्यवसायाने अभियंता असून इलेक्ट्रॉनिक उपकरणांची ते निर्यात करतात. येथे चिकूचे अमाप उत्पादन घेतले जाते. त्यावर आधारित लोणचे, चिप्स, पावडर अशी उत्पादने स्थानिक पातळीवर निर्माण केली जात आहेत. संशोधकवृतीच्या चुरी यांनी अथक प्रयत्नांतून चिकूपासून आइसक्रीम, शेक, हलवा, कतली, पेढा आदी पंधरा प्रकारच्या मिठार्इंची निर्मिती केली आहे. त्यामध्ये चिकू मोदकाचा समावेश असून गणेशोत्सवासाठी ते खास तयार केले आहेत. या करिता नोव्हेबर ते मे महिन्याच्या काळात चिकूच्या चिप्स केले जातात. नंतर त्या ओव्हनमध्ये सुकवून त्याची पावडर केली जाते. त्यानंतर विविध प्रकारची मिठाई बनविण्यासाठी त्याचा वापर केला जातो. गणेशोत्सवानिमित्त गतवर्षी प्रायोगिक तत्वावर चिकू मोदक बनविण्यात आले. त्याला ग्राहकांची विशेष पसंती मिळाल्यानंतर त्याची विक्री थेट मुंबईपर्यंत करण्यात चुरी यांना यश आले आहे.
या वर्षी पाचशे किलो चिकू मोदक बनविले आहेत. पाव किलोच्या पॅकमध्ये २१ मोदक या प्रमाणे दोनहजार बॉक्स मधून ४२ हजार चिकू मोदक विक्र ीकरिता तयार केले. त्या पैकी निम्मे हातोहात विकले गेले आहेत.