वसई महापालिकेचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 01:32 AM2021-02-08T01:32:21+5:302021-02-08T01:32:35+5:30
तीन कोटी रुपये पाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नालासोपारा : वसई-विरार महानगरपालिकेच्या क्षेत्रातील सोयी-सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांची मागणी सुरू आहे. मनपा हद्दीतील अनेक विकासकामे अर्धवट आहेत किंवा अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्यामुळेच अर्धवट राहिली असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मनपाने दुर्लक्ष केल्यामुळेच गार्डन आणि तलावाच्या सुशोभीकरणासाठीचे करोडो रुपये पाण्यात गेले आहे. आतापर्यंत कोट्यवधी रुपये मनपाने खर्च केल्यानंतरही मनपाचे गार्डन, तलाव सुशोभीकरणाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे स्थानिक नागरिक अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
वसई-विरार महानगरपालिकेचे नालासोपारा पूर्वेकडील आचोळे तलावाचे सुशोभीकरण, गार्डनमधील मुलांसाठी लावण्यात आलेले झोके, व्यायाम करण्याचे साहित्य यांच्या दुरुस्तीसाठी ३० जानेवारी २०१९ला २ कोटी ७० लाख ४१ हजार ४३१ रुपयांचे बजेट पास केले होते. या कामासाठी ठेकेदाराला २३० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. ठेकेदाराने काम करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसांनी तलावाची भिंत दोन ठिकाणी पडली. त्यामुळे काम थांबवावे लागले. दोन वर्षे उलटूनही तलावाचे काम सुरू झालेले नाही. तलावाची आणि गार्डनची स्थिती नाजूक झाली असून तुटलेले साहित्य धोकादायक झाले आहे. याबाबत मनपाने लवकरच कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले, तर दुर्घटना घडत नाही तोपर्यंत पालिका सुधारणार नाही, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
लॉकडाऊन काळात मनपा क्षेत्रातील तलाव आणि गार्डन सुशोभीकरणाचे काम थांबले होते. गार्डनमध्ये लवकरात लवकर नवीन व्यायामाचे साहित्य आणि लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य लावणार आहे.
- राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता,
वसई-विरार महानगरपालिका
साहित्य तुटलेले गार्डन
नालासोपारातील सनशाइन गार्डन, आचोळे तलाव, मोरेंगाव तलाव, महेश पार्क, धानिवबाग, वृन्दावन गार्डन, छेडानगर, विरार येथील नाना-नानी पार्क, मनवेलपाडा, बोळींज, वसईतील पापडी, गोखिवरे, वालीव, सातीवली येथील साहित्य तुटलेले आहे.
कोट्यवधी रुपये खर्चूनही गार्डनची स्थिती नाजूक आहे. आचोळे तलाव येथील खेळण्याचे व व्यायामाचे साहित्य तुटलेले आहे. लहान मुलांची घसरगुंडी, झोके तुटलेले आहेत. मनपाकडून ठेकेदारांना बजेट पास करून करोडो रुपये दिले जातात, पण अधिकारी याकडे कानाडोळा का करतात?
- विवेक पवार, स्थानिक