आंबा फळ तयार होताना बागायतदारांनी काळजी घ्यावी; संरक्षण कसे करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 11:30 PM2020-01-11T23:30:33+5:302020-01-11T23:30:52+5:30
आंब्यावर पडणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी एकरी; ४ या प्रमाणात फळमाशी सापळे बागेत लावावेत. या सापळ्यात फळमाशी आकर्षित होते व त्यात पडून मरते.
अनिरुद्ध पाटील
कोकणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. सध्याचे दिवस हे आंब्याला मोहोर येण्याचे आहेत. या दृष्टीने आंबा पीक संरक्षण कसे करावे, याबद्दल डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांच्याशी केलेली बातचीत...
प्रश्न : आंब्याला मोहोर आल्यानंतर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो?
आंब्याची झाडं मोहरल्यानंतर त्यावर तुडतुडे आणि भुरी या रोगासह फुलकिडे इत्यादीमुळे नुकसान होऊ शकते. तुडतुडे हे मोहोरातील रस शोषतात. त्यामुळे नवीन मोहोर सुकून किंवा गळून जातो. थंडीत मोहोरावर भुरी नावाच्या रोगामुळे राख आल्यासारखी लक्षणे दिसतात. हा रोग वाढून मोहोर काळा पडतो व गळतो.
प्रश्न : या दोन्ही कीड आणि रोगापासून मोहोराचे संरक्षण कसे करावे?
पहिली फवारणी मोहोर येण्यापूर्वी पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के हे कीटकनाशक ९ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. दुसरी फवारणी बाँगे फुटण्याच्या वेळी लॅमडा सायलोथ्रिन ५ टक्के कीटकनाशक ६ मिली व सोबत हॅकझाकोनाझोल ५ टक्के हे बुरशीनाशक ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. यानंतर १५ दिवसांनी तिसºया फवारणीकरिता बुफ्रॉफेझिन २५ टक्के हे कीटकनाशक १० मिली व सोबत भुरीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.
प्रश्न : हापूस आंब्यामध्ये चांगला मोहोर निघूनही फळे कमी लागण्याचे कारण काय?
हापूस आंब्यामध्ये परागीभवन व फळधारणा वाढविण्याच्या दृष्टीने या बागेत केशर, रत्ना यासह अन्य जातींची १० ते १५ झाडे लावावीत. तसेच सर्व जातीच्या झाडांमुळे बागेत चांगले परागीभवन होण्यासाठी एक एकरात मधपेट्या ठेवाव्यात.
पाऊस संपल्यानंतर मोहोर येईपर्यंत झाडांना पाणी देऊ नये. एकदा फळधारणा झाली म्हणजे दर १५ दिवसांनी बागेला पाणी द्यावे. एका झाडाला १५० ते २०० लिटर पाण्याची गरज असते.