गॅस गळतीने घराला लागली आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:48 PM2018-05-29T23:48:43+5:302018-05-29T23:48:43+5:30
तालुक्यातील सफाळे येथील मिरानगर मधल्या फातिमा कॉम्प्लेक्समधील सुधाकर दराडे यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती झाल्याने व शेगडीने पेट घेतला.
पालघर/सफाळे : तालुक्यातील सफाळे येथील मिरानगर मधल्या फातिमा कॉम्प्लेक्समधील सुधाकर दराडे यांच्या फ्लॅटमध्ये गॅस गळती झाल्याने व शेगडीने पेट घेतला. तात्काळ सफाळे ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजेश उर्फ बंटी म्हात्रे आणि सहकाऱ्यांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळविल्याने पुढला अनर्थ टळला.
दराडे हे आपली पत्नी आणि मुलासह कॉम्प्लेक्समध्ये राहतात. गुरुवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पत्नी स्वयंपाक करीत असतांना शेगडीला जोडलेल्या रबरी नळीने अचानक पेट घेतला. त्या मुळे घाबरलेल्या त्या महिलेने घरातील सर्वाना माहिती देऊन इमारतीच्या खाली आल्या. माहिती वाºयासारखी सर्वत्र पसरल्यानंतर उपसरपंच म्हात्रे आपल्या सहकाºयांसह घटनास्थळी हजर झाले. ते येई पर्यंत सिलेंडर पेटून संपूर्ण स्वयंपाक घराला आगीने घेरले होते. सर्वत्र पसरलेल्या धुरामुळे पुढचे काही दिसत नसल्याने म्हात्रे यांनी फ्लॅटच्या खिडकीची काच फोडली. धुराचा लोट बाहेर पडल्या नंतर पेट घेतलेल्या सिलेंडर जवळच आणखी एक भरलेला सिलेंडर असल्याचे पाहिल्यावर म्हात्रे यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्यांनी आपले सहकारी सर्पमित्र प्रशांत मानकर, मिकेश शेट्टी, नागेश परेड यांच्या मदतीने घरातील ब्लँकेट पाण्याने भिजवून त्या द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यास यश मिळविले. पाच मिनिटांचा उशीर झाला असता तर दुसर्या सिलेंडर ने पेट घेतला असता व मोठी जीवितहानी झाली असती. या घटनेमुळे भयभीत होऊन शेजारच्या फ्लॅट मधील एक महिला स्वयंपाक सोडून घराबाहेर पळाली होती.