गॅस पाइपलाइन प्रकल्पात भरपाई घोटाळा; मालकाऐवजी भलत्यालाच दिली भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:14 PM2018-07-21T23:14:08+5:302018-07-21T23:15:09+5:30
तर तुम्हीच करा वसूल, प्रशासनाचा शहाजोग सल्ला
वाडा : रिलायन्स समूहातील रिलायन्स गॅस ट्रान्सपोर्टेशन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी उभारत असलेल्या काकीनाडा हैद्राबाद, उरण, अहमदाबाद या गॅस पाइपलाइनच्या उभारणीसाठी संपादित केलेल्या जमिनीची भरपाई मूळ मालकाऐवजी भलत्यालाच देण्यात आल्याचा घोटाळा घडला आहे.
या पीडित शेतकऱ्याने जिल्हाधिकाºयांपासून ते तलाठ्यापर्यंत सगळ्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. परंतु त्याला हेलपाटे मारायला लावण्यापलीकडे व कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काहीही निष्पन्न झालेले नाही. असा दावा या शेतकºयाने केला आहे.
द्वारकानाथ गणपत पाटील यांची लाप (बुद्रुक)या गावात शेतजमिन आहे. त्यामधून नागोठणे ते दाहेज दरम्यानची गॅस पाइपलाइन गेलेली आहे. त्यासाठी ही जमीन संपादित करण्यात आली. परंतु तिची भरपाई त्यांना मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी दाद मागितली असता टाळाटाळ केली गेली व जेव्हा वरिष्ठांकडे तक्रार अर्ज करण्यात आले. तेव्हा या जमिनीची भरपाई कधीच देण्यात आली आहे. असे धक्कादायक उत्तर त्यांना देण्यात आले. ही भरपाई कुणाला दिली याची त्यांनी शहनिशा केली असता त्या व्यक्तींचा या जमिनीची कोणताही संबंध नसल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी आपले सरकार या पोर्टेलवर आॅनलाईन तक्रार केली. परंतु तिची दखल घेतली गेली नाही. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली असता त्यांनी उपविभागीय अधिकाºयांना आदेश दिला की, त्यांनी मला व्यक्तीश: बोलावून तक्रारीचे निराकरण करावे. परंतु त्यांनीही काही केले नाही. शेवटी १७ जुलै रोजी पाटील हे सर्व कागदपत्रांसह जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित होते. तरीही त्यांची फक्त या अधिकाºयाकडून त्या अधिकाºयाकडे अशी टोलवाटोलवी झाली, असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
भरपाई कुणाला द्यायची हे निश्चित करण्यासाठी जो पंचनामा करण्यात आला त्यात मात्र सरस्वती गणपत पाटील, द्वारकानाथ गणपत पाटील, जयवंत गणपत पाटील, विष्णू गणपत पाटील, सिंधुताई मारूती भोईर हे जमीनमालक आहेत. असे शासनाकडे असलेल्या नोंदीवरून स्पष्ट होते. असे म्हटले आहे. त्यात ज्यांना भरपाई देण्यात आली त्या कृष्णा परशुराम पाटील यांचा कोणताही उल्लेख नाही. तरीही त्यांना प्रत्यक्षात शेती करणारे शेतकरी संबोधून भरपाई देण्यात आली आहे. या पंचनाम्यावर ज्या पंचांची नावे नमूद केली आहेत त्यातील एका पंचाचे नाव वाचता देखील येत नाही. मात्र पंचनाम्याच्या ४ नंबरच्या पानावर शेती करणाºयाचे नाव कृष्णा परशुराम पाटील असे लिहिले आहे. त्यातही आधी कृष्णा नारायण पाटील असे नाव लिहिले होते. नंतर नारायण शब्द खोडून वरती परशुराम लिहिले गेले आहे. कृष्णा पाटील यांना स्वाक्षरी येत नाही असे भासवून त्यांच्या डाव्या हाताचा अंगठा घेतला आहे. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरणच संशयाच्या भोवºयात सापडले आहे. पाटील यांच्याप्रमाणेच अनेक शेतकºयांची फसवणूक झाली असल्याची शक्यता आहे.
सातबा-यावर नाव नाही, त्याला दिली भरपाई
विशेष म्हणजे सक्षम प्राधिकाºयाने द्वारकानाथ पाटील यांना पत्र पाठविले असून ही जमीन कृष्णा परशुराम पाटील हे कसत असून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा करून ही भरपाई त्यांना अदा केली आहे, असे कळविले आहे. जर ही भरपाई चुकीने दिली आहे असे आपणास वाटत असेल तर ती आपण त्यांच्याकडून वसूल करावी, अथवा त्याबाबतचा दावा न्यायालयात दाखल करावा, असा विचित्र सल्लाही सक्षम प्राधिकाºयाने द्वारकानाथ पाटील यांना दिला आहे.