आता ५,५०० ऐवजी फक्त ५०० रुपये भरून मिळणार गॅसलाइन; बविआच्या प्रयत्नांनी यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:50 AM2020-10-16T01:50:23+5:302020-10-16T01:50:31+5:30
गॅसजोडणीसाठी अनामत रक्कम ९० टक्क्यांनी घटवल्याने दिलासा
वसई : जीवघेण्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या मदतीसाठी विविध उपक्रम राबवणाऱ्या बविआने नागरिकांना आणखी एक दिलासा दिला आहे. पालघर जिल्ह्यातील अनेक सामान्य कुटुंबांना पाईपलाईन गॅस जोडणीसाठी भरावी लागणारी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम थेट ९० टक्क्यांनी कमी करून घेण्यात यश मिळवले आहे.
नालासोपाराचे बविआचे आ. क्षितीज ठाकूर यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. अखेर या प्रयत्नांना यश आले असून आता गुजरात गॅस लि. कंपनीने ग्राहकांना आकारली जाणारी अनामत रक्कम थेट ९० टक्क्यांनी कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे आर्थिक कंबरडे मोडले असताना पालघर जिल्ह्यातील नागरिकांना त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला असल्याची भा वनिक प्रतिक्रिया आ. क्षितीज ठाकूर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली आहे.
या आधी पाईपलाईन गॅस पुरवठा करण्यासाठी गुजरात गॅस लि. ही कंपनी ५ हजार ६१८ रुपये एवढी रक्कम अनामत म्हणून घेत होती. सध्या कोरोना काळात अनेकांचे धंदे, उद्योग व एकूणच रोजगारही गेले आहेत. अनेकांच्या वेतन-पगारांमध्येही मोठी कपात करण्यात आली आहे. हातावर पोट असणाऱ्यांना तर टाळेबंदीमुळे प्रचंड संकटाचा सामना करावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर पाईपलाईन गॅससाठी साडेपाच हजार रुपयांची अनामत रक्कम भरणेही अनेकांसाठी कठीण होते.
दि. २८ सप्टेंबर रोजी आ. क्षितीज ठाकूर यांनी गुजरात गॅस लि.च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. ही रक्कम एक तर पूर्ण माफ करावी किंवा निदान नाममात्र रक्कम आकारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. या बैठकीचा संदर्भ देत कंपनीचे उपाध्यक्ष नवीन शर्मा यांनी आ. ठाकूर यांना पत्र पाठवले आहे.
या गॅस कं.च्या निर्णयाबद्दल बहुजन विकास आघाडी, व्यक्तिश: मी आणि पालघर जिल्हावासी कंपनीचे आभारी असून सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता कंपनीने घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. या निर्णयामुळे सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळणार आहे.
- क्षितीज ठाकूर, आमदार, बविआ.