पेट्रोल पंप मालकास लुटणारी टोळी गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 06:38 PM2018-07-12T18:38:48+5:302018-07-12T18:40:35+5:30
पालघर गुन्हे शाखेची कारवाई
पालघर - ४ जून रोजी पेट्रोल पंप बंद करून घरी जात असताना ५ ते ६ अज्ञात चोरट्यांनी पंप मालकास घेरून, मारहाण करून त्यांच्याजवळील ५ लाख ५० हजारांची रक्कम असलेली बॅग हिसकून घेतली. त्यानंतर अज्ञात चोरटे फरार झाले. याबाबत पंप मालक गोपाळ शर्मा (वय - ५२) यांनी पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी खबऱ्यांमार्फत मिळालेल्या माहितीवरून ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गोपाळ शर्मा हे पंप मालक ४ जूनला रात्री १०. २२ वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून घरी जात असताना ५ ते ६ अज्ञात इसमांनी समोरून मोटार सायकलवरून येऊन शर्मा यांना घेरले. मोटारसायकलवरून खाली पाडून लाथाबुक्यांनी मारहाण केली आणि शर्मा त्यांच्याजवळील ५ लाख ५० हजार रुपयांनी भरलेली बॅग लंपास केली. त्यानंतर शर्मा यांनी पालघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हे शाखेने कसून तपास केला. त्यानंतर खबऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून काल रात्री १०.१० वाजता पालघर येथील वंकासपाड्यातून रवींद्र पिंपळे (वय - २४) आणि सचिन शिंदे (वय - २६) या दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी त्यांच्याकडून २ लाख ३४ हजार ४१० रुपये आणि बजाज एक्ससीडी मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या या दोन आरोपींच्या चौकशीनंतर प्रदीप वढाण (वय - २३) आणि संतोष चाकर (वय - २३) या दोघांना पोलिसांनी अटक केली. हे सर्व आरोपी वंकासपाड्यात राहणारे आहेत. हि कारवाई पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, अप्पर पोलीस अधीक्षक योगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पालघरचे पोलीस निरीक्षक किरण काबाडी, पालघर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद पवार आणि त्यांच्या पथकाने केली आहे.