वाड्यातील चेंदवलीत गॅस्ट्रोची साथ , महिला दगावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 05:05 AM2018-05-05T05:05:29+5:302018-05-05T05:05:29+5:30
वाडा तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे.
-वसंत भोईर
वाडा - तालुक्यातील चेंदवली गावातील वांगणपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा या तीन पाड्यांतील सुमारे ३५ नागरिकांना गॅस्ट्रोच्या साथीची लागण झाली आहे. यातील गिरिजा दांडेकर ही महिला दगावली असून दीपिका कामडी या महिलेची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. दूषित पाणी प्यायल्याने ही साथ उद्भवल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही साथ सुरू झाली आहे.
चेंदवली गावाला वांगडपाडा, टोकरेपाडा व डोंगरपाडा हे तीन पाडे आहेत. तेथे पाणीपुरवठा करणारी एक विहीर आहे. तिचे पाणी पिण्यासाठी व इतर कामासाठी वापरले जाते. बुधवारपासून या विहिरीतील पाणी प्यायल्याने नागरिकांना पोटदुखी, जुलाब व उलटीचा त्रास होऊ लागला. सर्वप्रथम गिरिजा दांडेकर हिला त्रास झाल्याने तिला उपचारासाठी वाडा येथील
ग्रामीण
रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान गुरुवार,
३ मे रोजी सकाळी तिचा मृत्यू
झाला. तर सायंकाळी एक एक
करत अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले.
त्यापैकी दीपिका कामडी हिची प्रकृती गंभीर असून तिला ठाणे येथील सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
विहीर अस्वच्छ
तिन्ही पाड्यांना एकाच विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. ही विहीर गेल्या अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आलेली नाही. तिच्यात गाळ साचला आहे. त्यामुळे पाणी दूषित झाले असून त्यामुळेच ही साथ पसरल्याचा आरोप ग्रामस्थ रावजी टोकरे व अजय डोंगरकर यांनी केला आहे.