गौरींच्या आगमनासाठी विक्रमगड बाजारात खरेदीची गर्दी
By Admin | Published: September 8, 2016 02:14 AM2016-09-08T02:14:00+5:302016-09-08T02:14:00+5:30
लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, असे म्हणत घरोघरी गौरीचे आगमन होत असल्याने विक्रमगडच्या बाजारात फुले, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची एकच
विक्रमगड : लक्ष्मी आली सोन्याच्या पावलांनी, असे म्हणत घरोघरी गौरीचे आगमन होत असल्याने विक्रमगडच्या बाजारात फुले, फळे, भाज्या खरेदी करण्यासाठी महिलावर्गाची एकच झुंबड उडाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तर गणपती आगमन झाल्याने व गौरीच्या आगमनाची तयारी यामुळे बाजारही गर्दीने फुलून गेला आहे.
गौरीच्या सजावटीसाठी लागणारे दागिने, मुखवटे, चोळी-साडी साजशृंगाराचे सामान, वेणी, फुलांचे दागिने, १६ प्रकारच्या भाज्या, सून, ओटीचे सामान आदी खरेदीसाठी महिलांनी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली होती. सणांचे औचित्य आणि वाढत्या मागणीमुळे भाव गगनाला भिडले आहेत.
गणपतीच्या आगमनानंतर लगेचच येणाऱ्या गौरीपूजनाचा सण उत्साहात साजरा करण्यासाठी विक्रमगडमधील महिला सज्ज झाल्या आहेत. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात विविध प्रकारे गौरीपूजन केले जाते. उद्या तालुक्यातील विविध ठिकाणी गौरीच्या मूर्तीची, मुखवट्याची स्थापना करण्यात येणार आहे. तालुक्यातील गावामध्ये आदिवासी लोक तेरड्याच्या फुलांनी गौरीला सजवून पारंपरिक नृत्य करुन गौरीची स्थापना करतात.
येथील शहरी भागात गौरीसाठी तसेच कोळी समाजामध्ये खेकड्यांचा किंंवा माशांचा नैवेद्य दाखविला जातो. दरम्यान, गौरी पूजनाच्या साहित्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत २० ते ३० टक्कयांनी भाववाढ झाली असल्याचे महिलावर्गाकडून सांगण्यात आले. मात्र, वर्षातून एकदा येणाऱ्या सणावर लोक खर्च करीत आहेत.