नवा फंडा, बंड करा पदे मिळवा
By Admin | Published: October 26, 2016 05:20 AM2016-10-26T05:20:54+5:302016-10-26T05:20:54+5:30
एकेकाळी शिवसेनेत असलेला मातोश्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख अनंत तरे यांचा पालघर जिल्हयातील दरारा घटत असल्याचा प्रत्यय
पालघर: एकेकाळी शिवसेनेत असलेला मातोश्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि संपर्क प्रमुख अनंत तरे यांचा पालघर जिल्हयातील दरारा घटत असल्याचा प्रत्यय उपनगराध्यक्षपदाच्या निवडणूकीत मंगळवारी आला. तो ही दुसऱ्यांदा! त्यामुळे बंडखोरी केली तर आपला खोपकर होईल अशी भीती ज्या सेनेत एकेकाळी होती व ज्या एकनाथ शिंदेंचा शब्द दिघेंप्रमाणे अंतिम मानला जायचा ते सारे आता संपले आहे. उलट पद मागून मिळत नसेल तर बंडखोरी करा आणि ते पदरात पाडून घ्या, हा नवा फंडा शिवसेनेत सुरू झाल्याचा साक्षात्कारही गेल्या पंधरवड्यात आला आहे. यामुळे केवळ पालघरमधल्याच नव्हे तर संपूर्ण शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
पालघर नगरपालिकेत शिवसेनेचे बहुमत आहे. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष तिचेच होते. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर उर्वरीत अडीच वर्षांसाठी नव्याने निवडणूक होणार होती. तिच्या आरक्षणानुसार नगराध्यक्षपद पुन्हा महिलांसाठी राखीव ठरले होते. त्यासाठी प्राजक्ता वर्दे आणि उपनगराध्यक्षपदासाठी अतुल पाठक यांची नावे एकनाथ शिंदे आणि अनंत तरे यांनी मातोश्रीवरून आलेल्या सीलबंद पाकिटातून जाहिर केली होती. त्यावेळी शिंदे सायलेंट रिव्हर रिसॉर्टवर तळ ठोकून होते तर तरेंनी पालघरात येऊन ही नावे जाहिर केली होती. त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक रईस खान यांनी व त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. तर जिल्हा प्रमुख पिंपळे यांनी या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाला हायकोर्टात आव्हान दिले होते. नगरविकास खात्याने यात गेम केला. तरे, शिंदे यांनी ज्यावेळी वर्दे, पाठक यांच्या उमेदवारीची घोषणा केली त्याच वेळी पालिकेत नगराध्यक्ष उपनगराध्यक्षांचे नवे आरक्षण जाहिर झाल्याचा फॅक्स पाठवला गेला. त्यामुळे सगळी गणिते बदलली व मातोश्रीला नव्याने उमेदवार ठरवावे लागले. रईस खान यांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी आपलीच उमेदवारी कायम राहील व फार तर नगराध्यक्षपदाचा उमेदवार बदलेले अशी पाठक यांची अपेक्षा होती. परंतु नव्या आरक्षणानुसार जेंव्हा उमेदवार घोषित झाले तेंव्हा नगराध्यक्षपदासाठी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे व बंडखोर रईस खान यांचे नाव उपनगराध्यक्षपदासाठी घोषित झाले. नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या सचिन पाटील यांनी माघार घेतल्याने एकट्या पिंपळेचांच अर्ज उरला व ते बिनविरोध निवडून येणार हे निश्चित झाले असेच उपनगराध्यक्षपदाबाबतही घडेल अशा समजुतीत असलेल्या शिंदे आणि तरे यांना पाठक यांनी आपला अर्ज ऐन वेळी दाखल करून हादरा दिला. माझ्या वेळी बंडखोरी करणाऱ्या रईस खान यांना जर उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचे बक्षिस मिळत असेल तर मी का गप्प बसावे? मी तोच मार्ग अनुसरतो अशा बाण्याने पाठक यांनी बंडखोरी केली. शेवटी शिंदे, तरे यांना पड खावी लागली व गटनेतेपद पाठक यांना बहाल करून माघारी घडवावी लागली. त्यामुळे प्रभाव घटला कुणाचा मातोश्रीचा की शिंदेंचा अशी चर्चा आहे. (विशेष प्रतिनिधी)
कोण आहेत हे बंडखोर अतुल पाठक?
पाठक हे शिवसेनेच ज्येष्ठ नगरसेवक आहेत. एकदा स्वीकृत नगरसेवक आणि दोनदा निवडून आलेले नगरसेवक अशी त्यांची कारकिर्द आहे. या ज्येष्ठतेच्या जोरावर किमान यंदा तरी आपल्याला उपनगराध्यक्षपद मिळावे अशी त्यांची अपेक्षा होती. ती फोल ठरल्याने त्यांना बंडोबा व्हावे लागले व त्याचे बक्षिसही त्यांना मिळाले. यामुळे आता बंडखोरी केली की शिवसेनेत सजा नव्हे तर पदाचे गिफ्ट मिळते, असा नवा ट्रेंड शिवसेनेत सुरू झाला आहे.